‘प्रीतीसंगम’चा प्रयोग ठरला सर्वांगसुंदर

By admin | Published: January 22, 2015 11:30 PM2015-01-22T23:30:51+5:302015-01-23T00:47:07+5:30

राज्य नाट्यस्पर्धा : ‘खल्वायन’च्या प्रयत्नाला रसिकांचा सलाम

The use of 'Preeti Sangam' was decided by Surajkundasundar | ‘प्रीतीसंगम’चा प्रयोग ठरला सर्वांगसुंदर

‘प्रीतीसंगम’चा प्रयोग ठरला सर्वांगसुंदर

Next

‘सं. प्रीतीसंगम’ हे संगीत नाट्य स्पर्धेत सादर झालेले पाचवे नाटक. कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ या संस्थेने हे नाटक सादर केले. हा प्रयोग हाऊस फुल्ल झाला. त्यामुळे बऱ्याच जणांनी हे नाटक नाट्यगृहात चार तास उभे राहूनही पाहिले.
सं. प्रीतीसंगम ही संत सखूच्या जीवनावर आधारित असलेली, जुन्या कालखंडातील कथा. हे नाटक जेव्हा बसवायचा विचार पक्का झाला, तेव्हा त्यातील फक्त पाच ते सहा प्रसिध्द पदे माहीत होती. पण, बाकीच्या पदांच्या मूळ चाली बराच प्रयत्न करुनही तेथे सापडल्या नाहीत, असे दिग्दर्शक मनोहर जोशी यांच्याकडून समजले. शेवटी प्रचलित असणाऱ्या पण माहीत नसलेल्या पदांना नवीन चाली देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे शिवधनुष्य नाटकाचे संगीत दिग्दर्शक आनंद प्रभूदेसाई यांच्याकडे सोपवण्यात आले.
हे शिवधनुष्य प्रभूदेसाई यांनी इतक्या समर्थपणे पेलले की, काही गीतांच्या चाली नवीन आहेत, हे कुणाला कळलेसुध्दा नाही. वेगवेगळे ताल व राग मिश्रणे वापरुन त्यांनी सुंदर चालींची अवीट गोडीची पदे बांधली.
जुन्या माहीत असलेल्या पदांमध्ये माहीत नसलेली नवीन चालीची पदे इतकी चपखलपणे सामावली की, या नवीन चालीच आता नाटकात विराजमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संत सखूची भूमिका करणाऱ्या श्वेता जोगळेकर यांच्या चेहऱ्यावरील भाव वाखाणण्याजोगे होते. विठ्ठलाशी एकरुप झालेली सखू, संसाराचा भार वाहणारी सखू, पतीबरोबरच्या प्रसंगात सोज्ज्वळ शृृंगारामधील सखू त्यांनी मोठ्या कौशल्याने रंगविली.
शमिका जोशी (उमा काकू) या संपूर्ण नाटकभर फॉर्ममध्ये होत्या. चालणे, दिसणे, संवाद फेक, अ‍ॅक्शन्स् या सर्व बाबतींत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अजिंक्य पोंक्षे (अंबादास) यांनी बावळट नवरा व नंतर बदललेला नवरा साकारताना मेहनत घेतल्याचे जाणवले. ‘तु सुुंदर चाफेकळी’, ‘आज आपुल्या प्रथम प्रीतीचा’ ही पदे आपल्या सुरेल गळ्याने सुंदर रंगवली. दीप्ती कानविंदे (चंद्रा) यांनी आपल्या उपजत अभिनयाने खाष्ट नणंद चांगली वठविली. या नाटकातील सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे दिंडी. दिडींचे नेतृत्व या नाटकाचे संगीत दिग्दर्शक आनंद प्रभूदेसाई (गोविंदबुवा) यांनी केले. दिंडीतील सर्व गीतप्रकार त्यांनी स्वत:च्या गायनशैलीत सादर केले. गाणे, दिंडीतील नाचणे एकदम लाजवाब होते. प्रत्येक गीतरचना सादर होत असताना दिंडीतील वारकऱ्यांच्या हालचाली नजरेत भरणाऱ्या होत्या. फुगडीसुध्दा अप्रतिम. सारे नाट्यगृह दिंडीमय होऊन गेले होते. प्रत्येक रसिकाच्या मनात आपणसुध्दा या दिंडीरुपी पालखीचे भोई व्हायला रंगमंचावर जावे, अशी इच्छा उत्पन्न झाली असेल, यात शंका नाही.
या नाटकातील ट्रीक सिन्स अगदी जिवंत वाटले. संस्थेच्या कलकारांनी सुपीक डोक्यातून ते तयार केल्याचे जाणवले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शन! मनोहर जोशी यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. दिग्दर्शन किती बेरकी असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सखू व तिचा पती अंबादास यांचा ‘आज आपुल्या प्रथम प्रीतीचा’ या गीतामधील प्रसंग. या प्रसंगात अजिंक्य पोक्षे (अंबादास) याने श्वेता जोगळेकर (सखू) यांच्यावर पाणी उडविण्याची अ‍ॅक्शन व थंड पाणी उडविल्यावर अंगावर उठलेला शहारा असा काही दिग्दर्शित केला की, सर्वांच्या अंगावर क्षणभर शहारा आला. विठ्ठलाच्या देवळातील कान धरुन उडी मारण्याची अ‍ॅक्शनदेखील बारीक निरीक्षणातून दिग्दर्शित करण्यात आली होती. प्रा. मधुसुदन लेले (आॅर्गनसाथ), हेरंब जोगळेकर (तबलासाथ), प्रथमेश तारळकर (ढोलकी, पखवाज साथ), सुमित मेस्त्री (इतर तालवाद्य), प्रा. सुहास सोहनी (टाळ) यांनी परस्पर समन्वयाने समर्थ साथसंगत केली. पार्श्वसंगीत आवश्यक तेथेच देण्यात आले. प्रवेश बदलताना आधीचे गीत वाजवण्याची पारंपरिक पध्दत जपण्यात आली. उत्तम प्रकाशयोजना, नपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यासुध्दा जमेच्या बाजू.
उदंड प्रतिसाद व नाटकाचे जबरदस्त सादरीकरण यामुळे दरवर्षी राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धा रत्नागिरीतच का व्हायला हवी? या प्रश्नाचे उत्तर नाटकाने दिले आहे.

Web Title: The use of 'Preeti Sangam' was decided by Surajkundasundar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.