सोशल मीडियाचा अतिवापर सर्वांसाठी घातक
By admin | Published: December 6, 2015 11:08 PM2015-12-06T23:08:10+5:302015-12-07T00:16:38+5:30
बाबासाहेब राशिनकर : शृंगारतळीतील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती; जनजागृतीची मोहीम हाती
शृंगारतळी : सोशल मीडिया समाजासाठी वरदान, त्याचबरोबर अयोग्य वापरामुळे शाप ठरत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. यासाठी गुहागर तालुक्यातील एका शिक्षकाने सोशल मीडियाचा अतिवापर स्वत:साठी व समाजासाठी कसा घातक ठरू शकतो, हे तरूण पिढीला पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम सुरु केली आहे.
फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर, गुगल, हाईक, युट्यूब या व अशा सार्वजनिक तंत्राच्या अतिवापरामुळे नातेसंबंधात कसा दुरावा निर्माण होत चालला आहे. हे प्रयोगातून मांडण्याचा प्रयत्न हेदवी येथील प्राथमिक शिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी शृंगारतळी येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात केला आहे.
या प्रदर्शनाला अनेकांनी भेटी दिल्या आहेत. मोबाईलचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी होत आहे, त्या प्रमाणात अतिवापरामुळे नुकसानही होत चालले असल्याचे ओरडून सांगण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून जनजागृतीच्या माध्यमातून हेदवी येथील प्राथमिक शिक्षक करत आहे. त्याच अनुषंगाने विज्ञान प्रदर्शनात जनजागृतीच्या उद्देशाने प्रकल्पाची मांडणी केली होती, असे शिक्षक राशिनकर यांनी सांगितले. देशभरात २१ कोटी लोक नेट वापरतात, तर १३ कोटी मुले कायम आॅनलाईन असतात, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातही याचा दुष्परिणाम जाणवू लागला आहे. मोबाईलच्या वापरामुळे अनेकांचे अपघात होऊन प्राणहानी होत आहे. सोशल मीडियामुळे सायबर क्राईम वाढले आहे. तरूणाईत खोट्या प्रतिष्ठेसाठी महागडे स्मार्ट फोन खरेदी करण्याची चढाओढ लागली आहे. महागडा फोन हातात असला तर इज्जत वाढते, अशी मानसिकता तरूणाईत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कर्ज काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महागडे मोबाईल खरेदी केलेली आहेत. मोबाईल ही गरज नसून, प्रतिष्ठेची वस्तू बनली आहे. सोशल नेटवर्किंगमुळे तरूणाई मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत चालला आहे. त्याप्रमाणे वेगवेगळे कार्टुन, हिंसक संगणक गेम यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत चालला आहे. लहान मुले शारीरिक खेळापासून दुरावत चालली आहेत, अशा प्रकारच्या समस्या त्यांनी मांडल्या. (वार्ताहर)