कोयनेच्या पाण्याचा वापर वेगाने!
By admin | Published: December 7, 2015 10:16 PM2015-12-07T22:16:52+5:302015-12-08T00:31:51+5:30
उन्हाची दाहकता वाढली : ६५ टीएमसी पाणी शिल्लक
पाटण : कोयना धरणातील पाणी साठ्यावर वीजनिर्मिती आणि सांगली जिल्ह्यातील सिंचनाची गरज भागविली जाते. पाणी वापराच्या वार्षिक करारातील सहा महिने संपले असून, उर्वरित सहा महिन्यांसाठी आता फक्त ६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मोठा वाटत असला तरी आगामी सहा महिन्यांत दुष्काळाची व उन्हाळ्याची दाहकता भयानक असणार असून, त्याला कसे तोंड द्यायचे हे अद्याप ठरलेले नाही. गेल्या वर्षी याच दिवशी ८९ टीएमसी पाणीसाठा होता.
कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या हंगामात धरणामध्ये ७९.६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा झाला. धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्रच दुष्काळजन्य स्थिती आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील कोयना धरणासह इतर मोरणा-गुरेघर तारळी, उत्तरमांड, वांग (मराठवाडी) आदी पाच मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठीची मागणी वाढत चालली आहे. कोयनेतून सांगलीकडे सध्या रोज ०.१८ टीएमसी पाणी सोडावे लागत असून, सिंचनासाठीच्या वार्षिक करारातील २२ टीएमसी किंवा त्यापेक्षा जास्त राखीव पाण्यासाठ्यापैकी आतापर्यंत १२ टीएमसी पाणी वापर झाला आहे.
सध्याच्या पाणीसाठ्यातील ५ टीएमसी साठा हा मृत पाणीसाठा आहे. वीज आणि सिंचन या दोन्ही खात्यांचा कोयना धरणावर जणू ताणच असून, त्यांनी मागणी केली की ते मागतील इतके पाणी पुरवावे लागते. यात कोणाचाही हस्तक्षेप अथवा नकार चालत नाही. दुसरीकडे राज्य शासन किंवा जलसंपदा विभाग कोयनेतील पाणी वापराचे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करण्याच्या मानसिकतेत अद्याप तरी नाही. त्यामुळे सध्या तरी कोयना धरणाकडे राज्याचे बारीक लक्ष आहे. कारण उन्हाळ्यात कोयनाच दुष्काळग्रस्तांना तारणहार ठरू शकते. (प्रतिनिधी)
कोयनेवर डोळा
यंदा राज्यात दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाईही जाणवत असल्याने कोयनेचे पाणी मिळाले पाहिजे, असा सूर काढला जात आहे. परवाच माजी मंत्री जयंत पाटील यांनी ‘सांगलीकडे पाणी सोडा,’ अशी मागणी केली तर काही विद्यमान मंत्री कोयनेचे पाणी मुंबईला नेणार, अशी भाषा करत आहेत; मात्र शिल्लक पाणीसाठा पुढच्या सहा महिन्यात कसा पुरवून पुरवून वापरावा, यावर मात्र कोणीच चर्चा करण्यास तयार नाही.
कोयनेतील पाणीसाठ्याचे फेरनियोजन कसे करावे, याचा आराखडा सांगली येथे झालेल्या अभियंत्यांच्या बैठकीत तयार झाला. तो मंजुरीसाठी मंत्रिस्तरावर पाठविला आहे. अद्याप त्याचा निर्णय बाहेर यायचा आहे. त्यामुळे सध्या तरी ‘महाजन’को आणि पाटबंधारे विभाग सांगलीच्या मागणीनुसारच पाणी वापर सुरू आहे.
- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन.