पॅक्लोब्युट्राझोल हापूससाठी उपयोगी

By admin | Published: November 15, 2015 09:40 PM2015-11-15T21:40:09+5:302015-11-15T23:55:47+5:30

बहार निर्मिती : शाकीय वाढीवर नियंत्रण

Useful for pancelotrazole haws | पॅक्लोब्युट्राझोल हापूससाठी उपयोगी

पॅक्लोब्युट्राझोल हापूससाठी उपयोगी

Next

कोकणातील उष्ण - दमट हवामानात वर्षाआड येणाऱ्या हापूसच्या झाडाअंतर्गत जिबरेलिन्ससारख्या शाखीय वाढीला उत्तेजन देणाऱ्या संजीवकाची अधिक निर्मिती होऊन अनावश्यक शाकीय वाढीला प्रोत्साहन मिळते. पॅक्लोब्युट्राझोल या संजीवकाची कार्यप्रणाली नेमकी जिबरेलिन्सच्या विरुध्द असल्यामुळे जिबरेलिन्सच्या अवाजवी निर्मितीत अडथळा निर्माण करुन अनावश्यक शाकीय वाढीवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे झाडाअंतर्गत ‘बहार’ निर्मितीस हवा असलेला समन्वय साधला जातो. त्यामुळे नियमित व लवकर बहार आणण्यास मदत होते़ डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या समस्येवर सन १९७५ ते १९९२ एवढ्या कालावधीत प्रदीर्घ संशोधन केले. हापूसच्या झाडाची योग्य मशागत करून दरवर्षी ३ - ४ आठवडे लवकर आणि नियमित मोहोर येण्यासाठी, तसेच उत्पादनात २ ते २.५ पट वाढ होण्याच्या दृष्टीने पॅक्लोब्युट्राझोल कार्यशील घटक असलेल्या संजीवकाच्या वापराची शिफारस करण्याचा बहुमान १९९१ - ९२मध्ये संपूर्ण देशात सर्व प्रथम मिळवला आहे.
पॅक्लोब्युट्राझोल तंत्रज्ञानाचा काटेकोर पध्दतीने अवलंब केल्यामुळे अनेक आंबा बागांचे उत्पादन ५ ते ६ टन प्रतिहेक्टरी सहज घेता येणे शक्य झाले आहे.़ मागील २० वर्षांमध्ये या संजीवकाला वाढता प्रतिसाद मिळत गेला असून, सुरुवातील कोकण विभागात फक्त ४०० ते ५०० लीटर वापर असलेल्या पॅक्लोब्युट्राझोलचा हंगामातील सध्याचा खप २ ते २.५ हजार लीटरपर्यंत पोहोचला आहे. सध्या कोकण विभागात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर १२ ते १५ वर्षांच्या पुढील वयाची झाडे आहेत. परंतु पॅक्लोब्युट्राझोलचा खप पाहता (प्रतिलीटर ४० ते ५० झाडे) फक्त ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये म्हणजेच एकूण आंबा क्षेत्राच्या ८ ते १० टक्के क्षेत्रावर पॅक्लोब्युट्राझोलचा वापर होत आहे. कोकणातील संपूर्ण आंबा उत्पादनाला संजीवनी देणारे हे संजीवक वापरासंबंधी शेतकऱ्यामध्ये अद्याप अनेक शंका आहेत. अशा शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने येथे काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ते निश्चितच आंबा बागायतदारांना माहितीवर्धक आणि उपयोगी ठरतील.
पॅक्लोब्युट्राझोल हे वाढरोधक गटातील संजीवक असून, त्याच्या शिफारशीनुसार केलेल्या वापरामुळे अनावश्यक होणारी शाखीय वाढ कमी होते. विषेशत: पावसाळ्यानंतर आॅक्टोबर - नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या पालवीवर नियंत्रण ठेवून ती ऊर्जा मोहोर निर्मितीस राखून ठेवण्यास मदत करते. परंतु झाडांची वाढ थांबत नाही. पॅक्लोब्युट्राझोल दिलेली झाडे वर्षभरात एक किंवा दोन वेळा भरपूर पालवल्यामुळे झाडाची वाढ नैसर्गिक प्रमाणे होत राहाते़ पॅक्लोब्युट्राझोलच्या शिफारशीनुसार योग्य मात्रा दिल्यास झाडांची शाखीय वाढ लांबी सुमारे २० ते २५ टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे झाडे आटोपशीर, ठेंगू होतात. परंतु ती खुरटी किंवा रोगट होत नाहीत. उलट पॅक्लोब्युट्राझोल दिलेली झाडे अधिक हिरवीगार आणि तजेलदार दिसतात. पॅक्लोब्युट्राझोल शिफारस केलेल्या प्रमाणात वापरल्यास कोणताही वाईट परिणाम होत नाही. पॅक्लोब्युट्राझोलच्या या गुणधर्मामुळेच पूर्वी १०१० मीटर अंतरावर आंब्याची लागवड करून हेक्टरी १०० झाडे लावण्याच्या तुलनेत ५ बाय मीटर (हेक्टरी ४०० झाडे) किंवा ६६ मीटर अंतरावर हेक्टरी २७६ झाडे लागवड करुन हेक्टरी दुप्पट आणि लागवडीच्या पाचव्या सहाव्या वर्षीच आंब्याचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. अलिकडे अतिदाट सधन लागवड पध्दती (अल्ट्रा हायडेनसिटी) (३ बाय २ मीटर ) पध्दतीची लागवड केवळ पॅक्लोब्युट्राझोलमुळेच शक्य झाली आहे. पॅक्लोब्युट्राझोलच्या वापरामुळे झाडांच्या आयुष्यमानात कसलीही घट होण्याची शक्यता नाही. कारण पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या झाडावर नैसर्गिक वाढ होण्यासाठी आवश्यक ती पालवी नियमित येत राहात.
कोकणातील उष्ण व दमट हवामान पालवी येण्यासाठी पोषक असल्याने गरजेपेक्षा जास्त वेळा पालवी येण्याचे प्रमाण कमी होऊन मोहोरण्यासाठी आवश्यक ते संतुलन साधले जाते. पॅक्लोब्युट्राझोलमुळे झाडांच्या वयोमानावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.
पॅक्लोब्युट्राझोलच्या वापरामुळे पानगळ होत नाही. काही ठिकाणी होणारी पानगळ तांबड्या कोळी (रेड माईट) या किडीच्या प्रादुर्भावाने होते. त्याचा पॅक्लोब्युट्राझोलच्या वापराशी संबंध नाही. पॅक्लोब्युट्राझोल न वापरलेल्या परंतु या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरही पानगळ होते.
झाडाच्या बुंद्याभोवती टिकावाच्या सहाय्याने ४’’ ते ५’’ खोल छिद्रामध्ये पॅक्लोब्युट्राझोलचे द्रावण दिल्यानंतर ते मातीच्या कणांवर घट्ट स्थिर होण्याचा गुणधर्म पॅक्लोब्युट्राझोलमध्ये आहे. पॅक्लोब्युट्राझोलचे द्रावण ओतल्यावर मारलेले छिद्र मातीने घट्ट व पूर्ण बंद करावे. छिद्र बंद केल्यानंतर पडलेल्या जोराच्या पावसामुळे पॅक्लोब्युट्राझोल वाहून जात नाही.
-एम. एम. बुरोंडकर,
कोकण कृषी विद्यापीठ

आॅस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंडोनेशिया, आॅस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, ब्राझिल या देशांमध्ये आंब्यासाठी, तर युनायटेड किंग्डम़, स्पेन, फ्रान्स या युरोपीय देशांध्ये इतर फळझाडांसाठी हे संजीवक वापरले जाते. हे संजीवक सध्या कल्टार, पॅक्लोटार, एक्सस्टार कोल्टार, बोल्टार, आॅसस्टर, खुशिया, प्रिडीक्ट, पॅक्लोमॅक्स, क्लिपर अशा अनेक नावाने विकले जाते. परंतु भारतामध्ये सध्या हे संजीवक तीन ते चार नावानेच नोंदीत आहे. ज्या पध्दतीने द्राक्ष बागायतदारांनी जिबरेलीक अ‍ॅसिड स्वस्त आणि सुलभरित्या भारतात उपलब्ध होण्यास प्रयत्न केले, त्याच धर्तीवर आंबा बागायतदारांनी प्रयत्न केल्यास संजीवक निम्म्या किमतीत उपलब्ध होईल.

Web Title: Useful for pancelotrazole haws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.