वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा: अनुपस्थित नगरसेवक 'सूचक'?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 05:47 PM2019-01-28T17:47:49+5:302019-01-28T17:49:37+5:30
सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या नगरसेवकाचे एका ठरावाला चक्क 'सूचक' म्हणून नाव घातल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे स्वीकृत नगरसेवक सज्जन रावराणे यांनी सभेत उघड केला. तर आम्ही सूचविलेल्या विकास कामांना सूचक म्हणून दुस-यांची नावे इतिवृत्तात घातली जात असल्याबद्दल नगरसेवक संतोष माईणकर यांनी नाराजी व्यक्त केली.
वैभववाडी: सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या नगरसेवकाचे एका ठरावाला चक्क 'सूचक' म्हणून नाव घातल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे स्वीकृत नगरसेवक सज्जन रावराणे यांनी सभेत उघड केला. तर आम्ही सूचविलेल्या विकास कामांना सूचक म्हणून दुस-यांची नावे इतिवृत्तात घातली जात असल्याबद्दल नगरसेवक संतोष माईणकर यांनी नाराजी व्यक्त केली.
या गंभीर प्रकराबाबत संताप व्यक्त करीत 'असा बोगस कारभार करण्यापेक्षा नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करा',अशी मागणी रावराणे यांनी केली. त्यावेळी मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना खडसावत 'प्रिंट मिस्टेक' झाल्याचे सांगून विषयावर पडदा टाकला.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीनची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा दीपा गजोबार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, बांधकाम सभापती संतोष पवार, आरोग्य, शिक्षण सभापती समिता कुडाळकर, नगरसेवक संजय चव्हाण, रवींद्र रावराणे, संतोष माईणकर, सरिता रावराणे, रोहन रावराणे, अक्षता जैतापकर, मनिषा मसूरकर, संपदा राणे, शोभा लसणे आदी उपस्थित होते.
वाभवे गांगो मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्याचा विषय मी मांडला होता. परंतु, त्या ठरावाला माज्याऐवजी सूचक म्हणून दुस-याचे नाव कसे घातले? आम्ही सुचविलेल्या विकास कामांना सुचक का बदलता? अशी विचारणा नगरसेवक संतोष माईणकर यांनी केली. तोच धागा पकडून सज्जन रावराणे यांनी 'नगरपंचायत प्रशासन खोटा कारभार करीत असल्याचा आरोप करीत स्वप्नील ईस्वलकर मुंबईत आहेत.
सभागृहात उपस्थित नसताना ते ठरावाला सूचक कसे होऊ शकतात?' असा प्रश्न उपस्थित करुन 'बोगस कारभार करण्यापेक्षा नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करा', असा संताप रावराणे यांनी व्यक्त केला. रावराणेंनी हा धक्कादायक प्रकार उघड केल्यानंतर मुखाधिकारी कंकाळ यांनी नगरपंचायत कर्मचा-यांना खडसावत ती 'प्रिंट मिस्टेक' आहे. यापुढे असे होणार नाही सांगत विषयावर पडदा टाकला.
शहरात स्वच्छतेची कामे होत नाहीत. बाजारपेठेत मोजून १८ मते आहेत. पण सहा कर्मचारी बाजारातच काय ती स्वच्छता करतात. अन्य भागात कोणीही फिरकत नसल्याचा आरोप सज्जन रावराणे यांनी केला. त्यावेळी स्वच्छता कामगारांना प्रभाग वाटून दिले असून त्यांना वही दिलेली आहे. ठरलेल्या दिवशी प्रभागात साफसफाई झाल्यावर संबंधित नगरसेवकांनी त्या वहीवर स्वाक्षरी करावी, असे आरोग्य सभापती समिता कुडाळकर यांनी स्पष्ट केले. तर स्वच्छता कामगार कमी आहेत. कामगार वाढविण्यासाठी निविदा मागवली असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शहरातील स्वच्छतेची घडी बसेल. आठवडाभरात ही संपुर्ण परिस्थिती सुधारले, असे कंकाळ यांनी सांगितले.
कलादालनाच्या उद्घाटन सोहळ्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शहराच्या पर्यटन विकासासाठी २ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या निधीतून संभाजी चौकात लॅडस्केपसह बगीचा, महाराणा कलादालनाचे विद्युतीकरण, परिसराचे सुशोभीकरण, व्यावसायिक गाळे तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये बगीच्या आदी कामे करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती कंकाळ यांनी दिली.