लस वेळीच उपलब्ध न झाल्यास लसीकरण बंद ठेवावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 PM2021-04-09T16:18:09+5:302021-04-09T16:20:20+5:30
Corona vaccine Zp Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६१ हजार ६०० कोविड प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झाल्या, तर आतापर्यंत सुमारे ६० हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लसींचा तुटवडा जाणवत असून, जर वेळीच लस उपलब्ध झाली नाही, तर पुढील दोन दिवस सुरू असलेले लसीकरण बंद ठेवावे लागणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आरोग्य समिती सभेत दिली.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६१ हजार ६०० कोविड प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झाल्या, तर आतापर्यंत सुमारे ६० हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लसींचा तुटवडा जाणवत असून, जर वेळीच लस उपलब्ध झाली नाही, तर पुढील दोन दिवस सुरू असलेले लसीकरण बंद ठेवावे लागणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आरोग्य समिती सभेत दिली.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य लॉरेन्स मान्येकर, प्रीतेश राऊळ, उन्नती धुरी, श्रीया सावंत, कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर आदींसह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मार्चपासून जिल्ह्यातील ५५ लसीकरण केंद्रांमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आतापर्यंत ६१ हजार ६०० लसी प्राप्त झाल्या, तर सुमारे ६० हजार जणांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असून, वेळीच आवश्यक असलेली लस उपलब्ध न झाल्यास पुढील दोन दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद ठेवावे लागणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी गुरुवारी आरोग्य समिती सभेत दिली.
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात अशुद्ध, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत समिती सदस्य प्रीतेश राऊळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तर लाल रंगाच्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने या पाण्याची तत्काळ तपासणी करा. तसेच शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा होईल यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करा, अशी सूचना केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच अन्य साथीचे आजारही बळावण्याची शक्यता दिसून येत आहे. तरी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. असे असतानाही जे आरोग्य कर्मचारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा तथा आरोग्य सभापती संजना सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना दिले.