कुडाळमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वैभव नाईकांना अश्रु अनावर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 2, 2024 07:16 PM2024-12-02T19:16:14+5:302024-12-02T19:16:47+5:30
आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे : वैभव नाईक
कुडाळ : माझा पराभव हा लढाई करून झाला आहे. पराभव स्वीकारला असून कोणतीही कारणे द्यायची नाहीत आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे, अशी प्रतिक्रिया कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी नाईक भावुक झाल्याने त्यांना हुंदका अनावर झाला.
कुडाळ तालुका उद्धवसेना पक्षाची सोमवारी बैठक वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, नागेंद्र परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाठ, तालुकाप्रमुख राजन नाईक तसेच सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी सोमवारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले की, आपण सर्वांनी लढाई लढली. माझ्यासाठी संघर्ष नवीन नाही, संघर्ष नेहमीच करत आलो आहे. या मतदारसंघाने दोन वेळा आमदार केले आताही ७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार आहे. सर्वांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. जे शेवटपर्यंत राहतील त्यांच्यासाठी काम करत राहणार. यावेळी संजय पडते यांनी सांगितले की, मतभेद बाजूला ठेऊन एकसंध रहा, सर्व कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली, सर्व गावागावात नाईक पोहचले, आपली ताकद तशीच ठेवा यापुढे यश आपलेच आहे.
मला आमदार म्हणू नका
आता मी आमदार नाही. त्यामुळे मला कोणीही आमदार म्हणून हाक मारू नका. वैभव नाईक या नावाने हाक मारली तरी चालेल. कारण पदे ही येतात, जातात ती कायमस्वरूपी नसतात आणि मी आमदारकी मिरवायची म्हणून कधीही मिरवली नाही. दुसऱ्या पक्षात देण्यासाठी मला अनेक प्रलोभने दाखवण्यात आली. परंतु आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाशी ठाम राहिलो पक्षाशी ठाम राहिलो हललो नाही.
काम न करणाऱ्यांच्या जागी नवे पदाधिकारी नेमा
आम्ही निवडणूक विचारावर लढवली मात्र विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे आणले. जे निवडून आले त्यांना मी या अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांनी चांगलं काम करावं. पक्ष संघटनावाढीबाबत त्यांनी सांगितले की जे पदाधिकारी काम करीत नाहीत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमण्यात यावेत.