वैभव नाईक यांनी शेवटचे काही महिने आमदारकी एन्जॉय करावी, समीर नलावडे यांचा उपरोधिक टोला
By सुधीर राणे | Published: June 12, 2024 03:54 PM2024-06-12T15:54:20+5:302024-06-12T15:55:04+5:30
ते कोणाच्या संपर्कात होते ?
कणकवली: रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना कणकवली शहरात विनायक राऊत यांच्यापेक्षा १,७१७ चे मताधिक्य मिळाले. उद्धवसेनेचे नेते आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांना आम्ही आव्हान देवून देखील त्यांनी ते स्विकारले नाही. पारकर बंधू व नाईक यांनी राऊत यांना या निवडणुकीत पराजित करण्याचे काम केले. नाईक यांनी शेवटचे २-३ महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी, असा उपरोधिक टोला समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी लगावला. कणकवली शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नलावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने भाजपाचे नगरसेवक, कणकवलीतील सर्व पदाधिकाऱ्यांवर शहरातील जनतेने विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजपर्यंतच्या इतिहासात कणकवली शहरामध्ये १,७१७ असे मताधिक्य कोणत्याही निवडणूकीमध्ये कुठच्याच उमेदवाराला मिळालेले नाही. ते मताधिक्य राणेंवर तसेच नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवून मिळाले आहे. कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जो निधी आला व या अडीच वर्षात जो विकास झाला त्याची पोचपावती म्हणून हे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे फक्त प्रसिद्धी माध्यमांसमोर आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, मेघा गांगण, राजश्री धुमाळे आदी भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ते कोणाच्या संपर्कात होते ?
आमदार वैभव नाईक हे कोणाच्या संपर्कात होते? ते आम्हाला माहित नाही. मात्र, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी शेवटचे २-३ महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी , असा उपरोधिक टोला समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी यावेळी लगावला.