वैभव नाईकांना मंत्रिपदाची स्वप्ने
By admin | Published: June 10, 2016 12:02 AM2016-06-10T00:02:57+5:302016-06-10T00:14:55+5:30
नीतेश राणे : नाईकांनी स्वत:च्या भविष्याची चिंता करण्याचा टोला
कणकवली : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांना आता मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे ते पालकमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणाच, असे आव्हान द्यायला लागले आहेत. त्यांनी आमची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता करण्यात वेळ घालवावा, असा प्रतिटोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला आहे.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी केलेल्या टीकेवर आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सिंधुुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ नगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाला संपवल्यानंतर त्यांना आता मंत्री पदाची स्वप्ने पडत असल्यामुळे राणे साहेबांच्या नावांचा वापर करून कॉँग्रेस कार्यकर्त्यांना डिवचून आपल्याला मंत्रीपद तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळते का? असे प्रयत्न करताना दिसत आहे. जिल्हाप्रमुख, आमदार, नगरसेवक या माध्यमातून मतदार संघातील सर्व कंत्राटे नातेवाईकांकडेच. आता त्यांची मंत्रीपदासाठी पळापळ चालली आहे. परंतू त्यांना आमची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करण्यामध्ये वेळ घालवावा. आणि लिंबू कापणाऱ्या बुवांकडे जाऊन नाईक प्रा. लि. नफा व विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करावा.
स्वत:च्या पालकमंत्र्यांना कसे अडचणीत आणायचे. आणि स्वत: मंत्री बनायचे हेच ध्येय असणारे नाईक पालकमंत्र्यांवर हक्कभंग आणाच असे सांगून स्वत:ची पोळी भाजताना दिसून येत आहेत. अज्ञानी असलेल्या नाईक यांनी विधीमंडळात कोकणावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचे विश्लेषण नीट कुठल्यातरी जाणकारांकडून किंवा त्याच्यासाठी सोशल मिडीयावर लिहिणाऱ्या अनुपम कांबळीकडून समजून घेतले असते तर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर किंबहुना कोकणी जनतेची धुळफेक केल्याचा आरोप स्वत:च केला असता. मुख्यमंत्र्यांच्या आकड्यावर कुडाळच्या जनतेने पण विश्वास ठेवला नाही. म्हणून तेथील जनतेने नगरपालिकेची सत्ता कॉँग्रेसच्या हातात दिली.
चिपी विमानतळ हे डिसेंबर २०१५ ला सुरू होणार असे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जाहीर केले होते. मग त्याला आता उशीर का? याचे उत्तर आमदार नाईक देऊ शकले नाहीत. त्याहीपेक्षा सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच जिल्ह्याला गोव्यापेक्षा कमी लेखल्याचा राग नाईकांना का आवरला नाही? याचेच आश्चर्य वाटते. स्वत:च्या मतदार संघातील सी-वर्ल्डबद्दल ना विधीमंडळात बोलतात. ना मतदार संघात बोलतात. यामधून नाईक यांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे.
राणे साहेबांना रत्नागिरीमध्ये हायवे चौपदरीकरणाला बोलविले गेले हे कदाचित आमदार नाईकांना खुपत असेल. त्या जाहीर कार्यक्रमातही राणे साहेबांचे भाषण ऐकले असते किंवा समजून घेतले असते तर तेथेही राणे साहेबांची ताठ आणि परखड भूमिका घेतली, कोकणी माणसाच्या हिताची होती. तीच बोलून दाखविली. चौपदरीकरणाचा मोबदला जास्तीत जास्त मिळावा ही खरी तर आमदार नाईकांची पण भूमिका असली पाहीजे होती. पण राजकारणापलीकडे त्यांचा काहीच स्वार्थ नाही हेच त्यांनी दाखवून दिले. (वार्ताहर)