मुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:50 PM2018-07-16T15:50:37+5:302018-07-16T15:57:50+5:30
कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ११० कोटी ७६ लाख रुपये प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी केली.
नागपूर : कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ११० कोटी ७६ लाख रुपये प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी केली.
कुडाळ शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण क्रमांक ६६ मध्ये कुडाळ शहरांत प्लाय ओव्हर व्हावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॉक्सवेल व अंडरपास बांधण्यात यावे, अशी मागणी कुडाळ बचाव समितीच्यावतीने करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाने अपेक्षित कारवाई केली नाही. ठेकेदार कंपनी मनमानी करत आहे. त्यातच अपेक्षित माहिती न दिल्याने बचाव समितीने महामार्ग बंदचे आपले आंदोलन कायम ठेवले आहे.
हे आंदोलन अधिक तीव्र व्हावे यासाठी प्रकल्पबाधीत गावात जाऊन बचाव समितीने जनतेचे प्रबोधन केले आहे. प्रशासनाच्यावतीने आंदोलन थांबविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या उपराजधानीत (नागपूर) सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यात सुरू असलेल्या ११० कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रस्तावाकडे विधानसभेत लक्ष वेधले.
कुडाळ बचाव समितीने मंगळवारी पुकारलेल्या महामार्ग बंद आंदोलनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेत आमदार नाईक यांच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने शासन हा प्रस्ताव मंजूर करते का? याकडे तमाम कुडाळ वासियांसह जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.