वैभव नाईक यांचे पंख शिवसेनेने छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:55 PM2019-07-31T15:55:41+5:302019-07-31T16:00:58+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे पंख छाटण्यात आले असून, त्यांच्याकडे आता कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांचे जिल्हाप्रमुख पद ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित सहा तालुक्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शिवसेना भवनातून करण्यात आली.
सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे पंख छाटण्यात आले असून, त्यांच्याकडे आता कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांचे जिल्हाप्रमुख पद ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित सहा तालुक्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शिवसेना भवनातून करण्यात आली.
चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. या बैठकीत प्रत्येक तालुकाप्रमुखांकडून कामांची माहिती घेतली होती. यावेळी अनेक तालुकाप्रमुखांनी विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या विरोधात थेट तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांना यापुढे संघटनेच्या कामात लक्ष न घालता कुडाळ व मालवण मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तेव्हा वैभव नाईक यांचे जिल्हाप्रमुख पद जाणार हे निश्चित झाले होते. गेले दोन ते तीन दिवस जिल्हाप्रमुख म्हणून कोणाची वर्णी लावायची यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात दोन जिल्हाप्रमुख ठेवायचे की एकच जिल्हाप्रमुख ठेवायचा यावर विचार झाला.
सुरुवातीला कुडाळ, सावंतवाडी वेंगुर्ले व दोडामार्गसाठी एक जिल्हाप्रमुख तर उर्वरित चार तालुक्यांसाठी एक असे दोन जिल्हाप्रमुख नेमायचे असा विचार झाला होता. यासाठी दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी तसेच संजय पडते हे या चार तालुक्यांसाठी इच्छुक होते. तर उर्वरित चार तालुक्यांसाठी देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर आणि मालवण येथील बबन शिंदे हे इच्छुक होते. मात्र प्रमुख नेत्यांच्या बैठकीत कणकवली व सावंतवाडी या विधानसभा मतदार संघासाठी एक जिल्हाप्रमुख तर कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांसाठी विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना कायम केले आहे.
संजय पडते मूळचे शिवसैनिक असले तरी मध्यंतरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत ते काँग्रेसमध्ये गेले. जेव्हा राणे काँग्रेसमध्ये जात होते त्यावेळीही पडते हेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांचे राणे यांच्या समवेत बिनसले आणि त्यांनी राणेंपासून फारकत घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची एसटी कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली होती. तर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते निवडून आले आहेत.
आता थेट त्यांना ६ तालुक्यांचे जिल्हाप्रमुख करून शिवसेनेने त्यांचे पुन्हा पुनर्वसनच केले आहे. तर विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे कुडाळ व मालवण मतदारसंघाचे आमदार असून, आता त्याच मतदारसंघाचे त्यांना जिल्हाप्रमुख केल्याने त्यांचे पंख छाटण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वेंगुर्लेचे तालुकाप्रमुख बदलले
शिवसेनेने वेंगुर्लेचे तालुकाप्रमुख बाळा दळवी यांना बदलेले असून, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब यांची तालुकाप्रमुख पदी वर्णी लावली आहे. दळवी यांनी दोन वर्षांपूर्वीच तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्यांना आता बदलण्यात आले आहे. त्यांच्या नावाची घोषणाही शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली.