वैभववाडीत हाहाकार; घरांना पुराचा वेढा

By admin | Published: September 25, 2016 01:09 AM2016-09-25T01:09:03+5:302016-09-25T01:09:03+5:30

जनजीवन विस्कळीत : सिंधुदुर्गात दुसऱ्या दिवशीही संततधार, ओसरगावात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

Vaibhavavadhi hahakar; Floodplains | वैभववाडीत हाहाकार; घरांना पुराचा वेढा

वैभववाडीत हाहाकार; घरांना पुराचा वेढा

Next

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने शनिवारी दिवसभर उसंत न घेतल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या ढगफुटीसदृश स्थितीमुळे वैभववाडी तालुक्यात हाहाकार माजला असून, गडमठ पावलेवाडीतील पाच घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. पाण्यामुळे घरामध्ये अडकून पडलेल्या २० आपद्ग्रस्तांना स्थानिकांनी सुरक्षित स्थळी हलविले.
कणकवली तालुक्यातील ओसरगाव-कांसाळीवाडीतील प्रभाकर सावंत शनिवारी सकाळी आपल्या दोन्ही बैलांना चरण्यासाठी घेऊन जात होते. नेहमीच्या पायवाटेवरून जात असताना तुटून पडलेल्या प्रवाही विजेच्या तारांचा स्पर्श होऊन दोन्ही बैल जागीच मृत्यूमुखी पडले. तसेच विजेचा धक्का बसून सावंतही जखमी झाले. फोंडा घाटात दरड कोसळल्याने देवगड-निपाणी राज्यमार्ग सुमारे दोन तास ठप्प होता.
सावंतवाडी येथे मुसळधार पावसाने कोसळलेल्या झाडांमुळे कुटीर रूग्णालयातील दोन गाड्यांचे दोन लाखांचे तर इतर ठिकाणी झालेल्या पडझडीत ५0 हजारांसह अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
शिवगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे लोरे क्रमांक १ मधील पूल पाण्याखाली गेल्याने दुपारपासून फोंडा-वैभववाडी मार्ग सात तासांहून अधिक काळ ठप्प होता. वैभववाडी-उंबर्डे मार्गही तीन तास ठप्प होता. सखल भागातील भातशेतीला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, भुईबावडा घाटात किरकोळ पडझड झाल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.
शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपून काढल्यानंतर शनिवारी पहाटेपासूनच जोर वाढला होता. सकाळी आठनंतर अक्षरश: ढगफुटीच झाली. सुमारे दहा तास अविश्रांत मुसळधार पडलेल्या पावसाने तालुक्यात दाणादाण उडवून दिली. दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यातील प्रमुख सर्व मार्ग ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले. एडगाव फौजदारवाडी पूल, सोनाळी गावठाणवाडी व कुसूर मळेवाडी येथे रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्ग तीन तास ठप्प झाला होता.
सोनाळीतील शाळेला पाण्याचा वेढा
सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोनाळी येथील अभिनव विद्यामंदिर शाळेला दुपारी साडेबाराच्या सुमारास पुराने वेढले होते. शाळेचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. परंतु, शनिवार असल्याने सकाळीच शाळा सुटली होती. त्यामुळे पुराचा फारसा फटका ‘अभिनव’ला बसलेला नाही.
तालुका प्रशासनाकडून दुर्लक्ष
गडमठ पावलेवाडीतील चार घरे व एका गोठ्यात पुराचे पाणी घुसल्याने हाहाकार उडाला. सुमारे २0 लोक पुरात अडकून पडले होते. याबाबत स्थानिकांनी महसूल विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनीच आपद्ग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. तरीही तालुका प्रशासनातर्फे कोणीही गडमठला फिरकले नव्हते. त्यामुळे नागरिकांना संताप व्यक्त केला.
गडमठला प्रथमच पुराचा तडाखा
सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडमठ पावलेवाडीतील चार घरे व एका गोठ्यात पुराचे पाणी घुसले. त्यामध्ये प्रवीण मोहिते, नारायण मोहिते, मनोहर मोहिते व तुकाराम मोहिते यांच्या घराचा तर प्रकाश पावले यांच्या गोठ्याचा समावेश आहे. पुरामुळे चारही घरातील धान्य, कपड्यासह जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे सुमारे २0 लोक अडकले होते. त्यांना विद्यानंद पावले, प्रवीण मोहिते, संदीप सावंत, गणपत सुतार, प्रथमेश पेडणेकर, सुनील कोलते, अमेय पावले, रत्नाकांत सावंत, आदी ग्रामस्थांनी पुरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. तसेच गडमठच्या मंदिरातही पाणी शिरले होते.
लोरेतील शिवगंगा नदीला महापूर
कुर्ली घोणसरीचा देवघर प्रकल्प असलेल्या शिवगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे लोरे क्रमांक १ येथील पूल दुपारी एकच्या सुमारास पाण्याखाली गेला. त्यामुळे फोंडा-वैभववाडी मार्ग सायंकाळी उशिरापर्यंत ठप्पच होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तळेरेमार्गे वळविण्यात आली होती. सायंकाळी ७ पर्यंत शिवगंगा नदीवरील पूल पाण्याखालीच होता. या पुलालगतच्या वस्त्याही पुरामुळे जलमय झाल्या होत्या.
भुईबावडा घाटमार्ग एकेरी
मुसळधार पावसामुळे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास भुईबावडा घाटाच्या पायथ्याशी दरड कोसळली. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही फिरकले नव्हते. त्यामुळे दुपारपासून रात्री उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. पावसाचा जोर कायम असल्याने घाटमार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे.










 

Web Title: Vaibhavavadhi hahakar; Floodplains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.