वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत
By admin | Published: October 19, 2015 11:24 PM2015-10-19T23:24:03+5:302015-10-20T00:19:52+5:30
चारजण बिनविरोध
वैभववाडी/ दोडामार्ग : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या संख्येत दोन जागांची भर पडली आहे. प्रभाग ३ मधून उत्तम कौराजी मुरमुरे (काँग्रेस) व प्रभाग १६ मधून सुचित्रा रत्नाकर कदम (विकास आघाडी) बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये विकास आघाडी २, भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक उमेदवाराचा समावेश आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही नगरपंचायतीत खाते उघडले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या निवडणुकीत आघाडी होऊ शकलेली नाही. तर दोडामार्ग नगरपंचायतीसाठी १७ जागांसाठी ५५ उमेदवारी अर्जांपैकी ४८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वैभववाडी नगरपंचायतीसाठी छाननीमध्ये प्रभाग क्रमांक ७ मधील काँग्रेसच्या उमेदवार मयुरी नाना तांबे हिचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याने भाजपच्या सुप्रिया राजन तांबे बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक १५ मधून पाचजणांनी माघार घेतल्याने विकास आघाडीचे रविंद्र ऊर्फ बाबू रावराणे बिनविरोध निवडून आले आहेत.
१३ जागांसाठी
३४ उमेदवार रिंगणात
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी प्रभाग १ - सुनील रामचंद्र रावराणे, रविंद्र सदाशिव रावराणे, प्रभाग ३ - कोंडिबा काळे, प्रभाग ५ - विवेक सज्जन रावराणे, डॉ. राजेंद्र सीताराम पाताडे, गुलाबराव शांताराम चव्हाण, प्रभाग ६ - जागृती समाधान रावराणे, प्रभाग ९ - उषा नामदेव गवळी, प्रभाग ११ - विवेक सज्जन रावराणे, प्रभाग १२ - विद्या सज्जन रावराणे, ऋतुजा रवींद्र भोवळ, प्रभाग १४ - समाधान मनोहर तांबे, प्रभाग १६ - सुचिता सुरेश करकोटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १३ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दोडामार्गात
६ जणांची माघार
कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांपैकी सहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर आरपीआयचे गणपती जाधव यांचा अर्ज दुबार असल्याने तो बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या रिंंगणात ४८ उमेदवार राहिले असून, यामध्ये काँग्रेस १०, राष्ट्रवादी ७, भाजप ९, शिवसेना ८, मनसे ४, आरपीआय १ तर अपक्षांच्या ९ अर्जांचा समावेश आहे. १७ पैकी ४ प्रभागात चौरंगी, ७ प्रभागात दुरंगी, तर ६ प्रभागात तिरंगी लढत होणार आहे.