वैभववाडी पंचायत समितीची सभा; कामे अडवून ठेवली जात असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:47 PM2019-12-02T15:47:06+5:302019-12-02T15:49:07+5:30
काही मजूर संस्था वेळेत कामे न करता केवळ अडवून ठेवतात. त्यामुळे तालुका विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप करीत अशा मजूर संस्थांची माहिती घेऊन त्या संस्थांना यापुढे कोणत्याही कामाचा मक्ता देऊ नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत केली.
वैभववाडी : काही मजूर संस्था वेळेत कामे न करता केवळ अडवून ठेवतात. त्यामुळे तालुका विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप करीत अशा मजूर संस्थांची माहिती घेऊन त्या संस्थांना यापुढे कोणत्याही कामाचा मक्ता देऊ नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत केली. त्यानुसार सभेत ठराव घेण्यात आला.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपसभापती हर्षदा हरयाण, दुर्वा खानविलकर, अक्षता डाफळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील आदी उपस्थित होते.
सभेत तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा विषय चर्चिला जात असताना काही मजूर संस्था निव्वळ कमिशन मिळविण्यासाठी विकासकामांचा मक्ता घेतात. परंतु ती कामे त्या संस्था वेळेत करीत नाहीत. त्यामुळे ही कामे अनेक वर्षे प्रलंबित राहतात. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील कामे गतीने मार्गी लावायची असतील तर अशा मजूर संस्थांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत मांडले. त्याला सभापती रावराणे यांनी सहमती दर्शवित कामे अडवून ठेवणाऱ्या संस्थांची माहिती घेऊन त्यांना यापुढे कामे देण्यात येऊ नयेत, असा ठराव घेण्यात आला.
चौदावा वित्त आयोग संपत आला तरी अजूनही निधी अखर्चित आहे. निधी का खर्च झाला नाही? त्याची नेमकी कारणे शोधणे आवश्यक आहे. अन्यथा पंधराव्या वित्त आयोगाच्या बाबतीतही तेच होईल. काही ग्रामपंचायतींमुळे तालुक्याची बदनामी होते. त्यामुळे निधी अखर्चित ठेवणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी सूचना रावराणे यांनी केली.
वैभववाडी-उंबर्डे व उंबर्डे-भुईबावडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. सध्याची खड्डे बुजविण्याची गती पाहता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास जानेवारी उजाडेल. त्यामुळे अधिक यंत्रणा उभी करून तत्काळ खड्डे बुजवावेत, अशी सूचना रावराणे यांनी केली.
रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतील विसंवादाची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु त्यांच्याशी आम्हांला काहीही देणेघेणे नाही. रुग्णालयात जाणाऱ्या प्रत्येक रुग्णावर चांगले उपचार आणि त्यांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका लोके यांनी सभेत मांडली. त्यावेळी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर आपण कारवाई करीत आहोत. मात्र, त्यासंदर्भात चुकीची माहिती काही कर्मचारी बाहेर देत असल्याचे स्पष्ट केले.
वीज वितरण राबतेय ठेकेदारांसाठी
वीज वितरण विभागाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. या विभागाच्या कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे. लोकांची गरजेची कामे न करता ठेकेदारांच्या फायद्याची कामे करण्यावर अधिकाऱ्यांचा भर आहे. वीज वितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर वीज वितरणला टाळे ठोकले जाईल असा इशारा वैभववाडी पंचायत समितीचे सदस्य मंगेश लोके यांनी दिला.
सभागृहात वाटले पेढे
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्याबद्दल सभागृहात सदस्य मंगेश लोके यांनी सर्व पंचायत समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी घेण्यात आला.