Sindhudurg: वैभववाडी रेल्वे स्थानक 'अच्छे दिन'च्या प्रतिक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:45 IST2025-03-07T19:44:56+5:302025-03-07T19:45:29+5:30
समस्यांचे ग्रहण आणि 'कोमेजलेल्या' राजकीय 'इच्छाशक्ती'चा' प्रवाशांना बसतोय फटका

संग्रहित छाया
प्रकाश काळे
वैभववाडी : वैभववाडी कणकवली, देवगड, गगनबावडा या चार तालुक्यातील प्रवाशांचा आधार असलेल्या वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. त्यामुळेच सुट्या, सण, उत्सव सोडले तरी दरदिवशी हजारो प्रवाशांची ये-जा होत असलेल्या वैभववाडी रोड रेल्वे स्थानकावर 'अच्छे दिन' कधी येणार? याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. हे रेल्वे प्रवाशांचे दुर्दैव म्हणावे की प्रवाशांविषयी असलेली अनास्था? हेच समजून येत नाही. रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी स्व. बंडू मुंडल्येंव्यतिरिक्त आजमितीस कोणीही 'ट्रॅक'वर उतरुन काहीतरी स्थानकाच्या म्हणजे रेल्वे प्रवाशांच्या पदरात पाडून घेताना दिसले नाही.
वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.
आरक्षण खिडकी ५ वर्षांपासून बंदच!
कोविडमुळे मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन झाले. त्यावेळी बंद झालेली वैभववाडी रेल्वे रोड रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडकी पाच वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांना ४०० रुपयांचे तिकिट आरक्षित करण्यासाठी वैभववाडीतून ३०० ते १५०० रुपये आणि अर्धा दिवस खर्चून ३५ किलोमीटरवर कणकवलीत जावे लागते. त्यातूनच जाणं लांबलं किंवा रद्द झाले तर पुन्हा तेवढाच वेळ आली पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे बऱ्याचअंशी तिकिट रद्द करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. त्यामुळे न केलेल्या प्रवासासाठी जवळपास २००० रुपयांचा भुर्दंड पडतोय. परंतु, रेल्वे प्रवाशांची होत असलेली गैरसोय, आर्थिक नुकसान आणि त्रासाविषयी कुणाला काहीही देणेघेणे नाही हे मागील ५ वर्षात प्रकर्षाने दिसून आले.
छप्पर, बैठक व्यवस्था आणि स्वच्छतेची वानवा
वैभववाडी रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर छप्पर नाही. ऊन्ह आणि पावसाळ्यात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्यात गडी प्लॅटफॉर्मवर येत असताना बॅग, व अन्य सामानाची पिशवी हातात घेऊन थांबलेल्या प्रवाशांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा आणि पावसाळ्यात भिजून चिंब झालेले प्रवाशी पाहताना वैभववाडी स्थानकाला कै. बंडू मुंडल्येंच्या पश्चात कोणीच वाली उरला नसल्याची जाणीव होते. त्यामुळेच प्रवाशांना गाडीची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पायऱ्यांवर बसावे लागत आहे.
पादचारी पूलाची गती कासवाला लाजविणारी
वैभववाडी रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ये-जा करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल मंजूर करुन घेतला. त्याचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी १३ ऑक्टोबरला करण्यात आले. त्यामुळे चार पाच महिन्यांत पादचारी पूल पूर्ण होईल, या भाबड्या आशेने प्रवासी सुखावले होते. परंतु, भूमिपूजन होऊन सहा महिने होत आले तरी पादचारी पुलाचा पत्ता नाही. या पादचारी पूल कामाची गती अक्षरशः कासवालाही लाजविणारी आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन प्रवाशांना खुला होण्यास निश्चित किती महिने, वर्ष जातील याचा ठामपणे अंदाज सांगणे मुश्किल आहे.
अजून किमान २ गाड्यांना थांबा आवश्यक
सकाळी ८.३० च्या तुतारीनंतर सायंकाळी ४ वा. येणारी मांडवी, दिवा पॅसेंजर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोकणकन्यापर्यंत मुंबई व उपनगरातून येणारी एकही रेल्वे वैभववाडी स्थानकात थांबत नाही. तशीच दुपारच्या मांडवी नंतर रात्री तुतारी, कोकणकन्या नंतर दुसऱ्या दिवशी दिवा पॅसेंजर पर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या एकाही जलद गाडीला येथे थांबा नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती किंवा दुःखद प्रसंगावेळी प्रचंड आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे दुपारी १२ ते १ वा. आणि रात्री ९-१० वा मुंबईहून येणाऱ्या तसेच सकाळी ६-७ वा. आणि सायंकाळी ५-६ वा वैभववाडी स्थानकावरुन मुंबईकडे जाणाऱ्या दोन जलद गाड्यांना थांबा व आरक्षण कोठा मिळण्याची गरज आहे.