त्या ठेक्यांचे वराडकरांनी आत्मपरीक्षण करावे : मंदार केणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:36 PM2020-11-09T16:36:36+5:302020-11-09T16:38:20+5:30
malvan, muncipaltyCarporation, sindudurg मालवण नगरपरिषदेमध्ये सध्या पाणीपुरवठा, कचरा, वाहन ठेके हे कुणाच्या आशीर्वादाने चालले आहेत त्याचे आत्मपरीक्षण उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी करावे. स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करण्याचा धंदा आता बंद करावा
मालवण : मालवण नगरपरिषदेमध्ये सध्या पाणीपुरवठा, कचरा, वाहन ठेके हे कुणाच्या आशीर्वादाने चालले आहेत त्याचे आत्मपरीक्षण उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी करावे. स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करण्याचा धंदा आता बंद करावा. नगराध्यक्ष यांना जनतेने निवडून दिले आहे. ते आपल्या कामकाजाचा लेखाजोखा निवडणुकीत जनतेसमोर मांडतीलच. वराडकर हे वैफल्यग्रस्त झाले असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला मदत न करता राजकीय वक्तव्य करण्यात ते धन्यता मानत आहेत, अशी टीका नगरसेवक मंदार केणी यांनी केली.
उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्यावर केलेल्या टीकेचा नगरसेवक केणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे समाचार घेतला आहे. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी उपनगराध्यक्ष वराडकर यांचे पालिकेतील अर्थकारण पूर्णपणे निष्क्रिय करून टाकले आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले वराडकर हे त्याच पक्षाच्या महिला आरोग्य सभापती यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांवर टीका करणारे उपनगराध्यक्ष नक्की कोणत्या पक्षाचे आहेत ? असा सवाल केणी यांनी केला आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, अग्निशमन नवीन वाहन खरेदीबाबत नवीन गाडीसाठी १ कोटी मागणीचा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिफारस घेऊन अग्निशमन विभागास सादर करण्यात आला आहे. सध्या कोरोना संकट काळात सर्वच प्रशासकीय कामकाज निधी वितरण याबाबत निर्णय घेण्यास विलंब झालेला असल्याने याकामी उशीर होत आहे. उपनगराध्यक्ष जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत.
मालवणच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सावंतवाडी येथील खासगी सक्शन गाडी भाडे तत्त्वावर आणून गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत पालिकेत अर्थकारण हिशेब मांडणाऱ्या उपनगराध्यक्ष यांच्या विचारांच्या पलीकडे आम्ही काम करतो आहोत.
भाजपमध्ये राहून भाजपवरच बाण
भाजपमध्ये राहून कुठल्या पक्षाच्या दिशेने बाण मारत आहेत, हे उपनगराध्यक्ष वराडकर यांनी आधी स्पष्ट करावे. सतत प्रसिद्धीत राहण्यासाठी सोयीनुसार भाजपच्या पदाचा आधार घेऊन आपल्याच पक्षाच्या सभापतींवर आरोप-प्रत्यारोप करायचे ही उपनगराध्यक्ष यांची कामगिरी आहे.
ज्या पक्षातून निवडून येतात, त्याच पक्षाशी गद्दारी करतात, हा वराडकर यांचा राजकीय इतिहास आहे. यावेळी पालिका निवडणुकीत घोडेबाजार चालणार नाही याचे भान त्यांनी ठेवावे, असा चिमटा मंदार केणी काढला. तसेच यानंतर कोणतेही आरोप करताना आधी विचार करावा आणि नंतरच बोलावे.