Sindhudurg News: हळदी-कुंकवाचे वाण, पर्यावरणाची जाण, केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 06:15 PM2023-01-27T18:15:11+5:302023-01-27T18:15:45+5:30
महिलांनी हळदी-कुंकवाच्या दिवशी हरितगाव आणि स्वच्छ गाव राखण्याचा केला संकल्प
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आदर्श उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीने हळदी-कुंकू कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. यावर्षी महिलांनी हळदी-कुंकवाच्या दिवशी हरितगाव आणि स्वच्छ गाव राखण्याचा संकल्प केला. त्या अनुषंगाने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणही केले. एवढेच नव्हे, तर वृक्ष जगविण्याचे नियोजनही केले. त्यामुळे ‘हळदी-कुंकवाचे वाण, देईल जन्मभर आठवण’चा संदेशही यानिमित्ताने मिळाला.
महिला माता-भगिनी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आज हळदी-कुंकू समारंभ उत्तमरीत्या पार पडला. महिलांना वाण दिलेच, शिवाय महिलांनी हळदी-कुंकू वेगळा संदेश देणारा ठरला. महिलांनी वृक्षारोपण करत वाण कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी सुपारी रोपे चव्हाटा मंदिर परिसरात लावली. शिवाय ‘स्वच्छ गाव, हरित गाव’चा संकल्पही महिलांनी केला. ग्रामपंचायत, आदर्शगाव समिती, संजीवनी बहुउद्देशीय संस्था, वनश्री फाउंडेशनतर्फे कार्यक्रम झाला.
गाव स्वच्छतेत महिलांनी घेतला पुढाकार
- कार्यक्रमाचे औचित्य साधून संजीवनी संस्थेच्या सौ. दीक्षित यांच्यासह महिला उद्योजकता प्रशिक्षक विनीता देसाई यांनी महिलांना रोजगारविषयक मार्गदर्शन करीत स्वावलंबनाचे धडे दिले.
- संजीवनी संस्थेने महिलांना हळदी-कुंकू वाण म्हणून सुपारी रोपे दिली.
- ती महिलांनी केर चव्हाटा मंदिर, ग्रामपंचायत, जि. प. शाळा केर नं. एक, जि. प. शाळा निडली, जि. प. शाळा भेकुर्ली येथे वृक्षारोपण केले. तसेच गाव स्वच्छतेत महिलांनी आपण पुढाकार घेण्याचा संकल्प केला.