शिरगाव केंद्रातील वाण अन्य राज्यांसाठी फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2015 09:28 PM2015-04-19T21:28:24+5:302015-04-20T00:01:33+5:30
विद्यापीठांतर्गत शिरगाव येथे १९१३ साली कृषी संशोधन केंद्राची स्थापना झाली. सुरूवातीला बीज संकलन करण्यात आले. त्यातील कोणते बीज येथील जमिनीच्या प्रतवारीनुसार अधिक उत्पादन
मेहरून नाकाडे - रत्नागिरी -डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगावच्या कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या अनेक वाणांची राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिकांमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. रत्नागिरी १ (आयईटी क्र.५६१२) भाताचे वाण अमेरिका व कॅरेबियन आयलँड येथील पेराग्वे प्रदेशात सीईए ३ नावाने १९८९ साली प्रसारीत करण्यात आले. तर रत्नागिरी १ (आयईटी क्र. ७४५३) हे वाण दक्षिण आफ्रिकेतील झांबिया प्रांतात १९९० साली प्रसारीत करण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठाने विकसित केलेल्या सह्याद्री मालिकेतील संकरीत जाती महाराष्ट्रासह गोवा, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा या विविध राज्यांमध्ये लागवडीखाली आहेत.
विद्यापीठांतर्गत शिरगाव येथे १९१३ साली कृषी संशोधन केंद्राची स्थापना झाली. सुरूवातीला बीज संकलन करण्यात आले. त्यातील कोणते बीज येथील जमिनीच्या प्रतवारीनुसार अधिक उत्पादन देऊ शकेल, याचा अभ्यास करण्यात आला. पटणी, पनवेल, वाकसाल, वरंगळ, सोरटी, कोलंब प्रकारच्या भाताची लागवड पूर्वीचे शेतकरी करत असत. १९६० ते ७३ हा काळ हरितक्रांतीचा होता. तायचुंग नेटिव्ह १ आणि आय. आर. ८ या जाती चीन व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था मनीला, फिलीपाईन्स येथून आणण्यात आल्या. जनुकांचे संकरीकरण करून रत्नागिरी २४ बारीक दाण्याची जात विकसीत करण्यात आली. त्यानंतर विविध कालावधीच्या वेगवेगळ्या दाण्यांचा प्रकार असणाऱ्या आणि विभागानुसार भाताच्या नऊ सुधारीत जाती (रत्नागिरी २४, रत्नागिरी ६८-१, रत्नागिरी ७११, रत्नागिरी ७३-१, रत्नागिरी १, २, ३, ४, ५) आणि एक संकरीत जात (स ह्याद्री ५) विकसीत करण्यात आली.
कोकणातील जमिनीचा पोत ओळखून अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसीत करण्यात आल्या. ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये वाढ होऊन ७७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. कोकणाची भात उत्पादकता १.८ टन प्रतिहेक्टर होती ती आता ३.७ टन झाली आहे. रायगड २.०८, ठाणे २.०६, सिंधुदुर्ग ४.१७ टन प्रतिहेक्टरी उत्पादन क्षमता आहे. केंद्राने १७ मादी वाणाची निर्मिती केली असून, ज्याचा उपयोग सध्या संकरीत बीज निर्मितीसाठी होत आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानामुळे भातपेरणीपासून भातझोडणीपर्यंत अनेक यंत्रांचा वापर शेतकरी करीत आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या चारसूत्री भातलागवढीचा प्रसारही वाढला आहे. दाटीवाटीने पारंपरिक पध्दतीने केलेली शेती वाढल्यानंतर जमिनीवर लोळून दाण्याचे नुकसान होत असे. मात्र, चारसूत्री पध्दतीमुळे सुटसुटीत लागवड होते. शिवाय त्यामुळे उत्पन्नही वाढत आहे. शिवाय रासायनिक खताची ४० टक्के, बियाण्यांची ५० टक्के बचत होते. मजुरीवरील खर्च कमी होतो. परिणामी उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. भातासाठी ‘श्री’ लागवड पध्दत (एसआरआय) प्रचलित होऊ लागली आहे. या पध्दतीमुळे पाण्याची व बियाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारत आहे. उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांच्या वेळेतही बचत होत आहे. कोरड्या जमिनीत पेरणी करण्याच्या किंवा भाताला मोड काढून पेरणी करण्याच्या ‘पेरभात’ पध्दतीमुळे पुनर्लागवडीच्या खर्चात बचत होते. पेरणीसाठी विकसीत केलेल्या ड्रमसिडर यंत्रामुळे रांगेत व ठराविक अंतरावर भाताची उगवण होते. केंद्राने लांब दाण्याच्या, अधिक प्रत असलेल्या आणि लाल दाण्याच्या संकरीत भात वाणांचे संशोधन सुरू केले आहे. या तांदळामुळे लोह, कॅल्शियम, झिंक अधिक मिळणार आहे. एकूणच विद्यापीठाने विकसीत केलेल्या जातीचा प्रसार कोकणासह राज्यातील अन्य जिल्ह्याबरोबर लगतच्या राज्यात होऊ लागला आहे.
भाताची उत्पादकता वाढविणारे संशोधन..
शिरगांवच्या कृषी संशोधन विकास केंद्राने विकसीत केलेल्या अनेक वाणांची चाचणी घेण्यात आली. सह्याद्री मालिकेतील संकरित जाती महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये लागवडीसाठी उपलब्ध झाल्या व त्यातून भाताचे उत्पन्नही वाढले. संशोधनाने सिध्द झालेली ही भात वाणांमधील व्हरायटी यापुढेही शेतकऱ्यांना किफायतशीर ठरणार आहे. कोकणातील जमिनीचा पोत ओळखून अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाची निर्मिती झाल्याने शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरले आहे. कोकणची भात उत्पादकताही आता वाढली आहे.