पर्यटन महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा
By admin | Published: March 31, 2015 09:45 PM2015-03-31T21:45:26+5:302015-04-01T00:10:46+5:30
जय्यत तयारी : वाळूशिल्पासह नौकानयन स्पर्धाही रंगणार
रत्नागिरी : पर्यटन महोत्सवात वाळूशिल्प तसेच नौकानयन स्पर्धा अशा विविध स्पर्धा रंगणार असून या स्पर्धांची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.भाट्ये येथे रंगणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून यानिमित्त विविध स्पर्धाही पार पडणार आहेत. वाळूशिल्प स्पर्धेतील प्रथम विजेत्याला २१ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्याला १५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय विजेत्याला ११ हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच चार उत्तेजनार्थ विजेत्यांना २ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा विषय कोकण संस्कृती व लोकजीवन, कोकणातील पर्यटन स्थळे, समुद्रातील जीवसृष्टी हा आहे.
वाळूशिल्प स्पर्धकांनी स्वखर्चाने भाट्ये बीच येथे भाग घ्यावयाचा आहे. वाळूशिल्पासाठी आवश्यक वाळपुरवठा, पाणी पुरवठा व प्रकाश व्यवस्था महोत्सव समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. स्पर्धकांनी शनिवार, १८ एप्रिल २०१५ पर्यंत पत्तन अभियंता, पत्तन विभाग, मांडवी बंदर, रत्नागिरी या कार्यालयात नावनोंदणी करावी. त्यासाठी स्पर्धकांनी विहीत नमुन्यातील अर्ज व आपला संपूर्ण बायोडाटा पासपोर्ट साईज फोटोसह देणे आवश्यक आहे.
नौकानयन स्पर्धेतील विजेत्याला २१ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्याला १५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय विजेत्याला ११ हजार रुपये व प्रमाणपत्र व चार उत्तेजनार्थ विजेत्यांना ३ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत फक्त फायबर, लाकडी नौकांना भाग घेता येईल.
स्पर्धेची नावनोंदणी २५ एप्रिल २०१५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अतुल धोत्रे बंदर निरीक्षक, मांडवी बंदर, रत्नागिरी यांच्याकडे करावी. अधिक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)