काळसेतील विविध विकासकामे ठरताहेत रोल मॉडेल
By Admin | Published: October 4, 2015 10:16 PM2015-10-04T22:16:56+5:302015-10-04T23:41:34+5:30
गोसावीवाडीवासीयांचा उपक्रम : जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले कौतुक
चौके : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे, लोकवर्गणीतून साकारलेल्या विविध विकासकामांमुळे ही वाडी तालुक्यात रोल मॉडेल ठरत आहे.गोसावीवाडीच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणारे वाडीतील सुपुत्र तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार शरद गोसावी यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांची गणेश विसर्जनाची अडचण लक्षात घेऊन चालू वर्षी गोसावीवाडीतील सिद्ध महापुरुष मंदिरानजीक सुसज्ज पक्का बंधारा, विस्तीर्ण आणि सुशोभित गणेश विसर्जन घाट, निवारा शेड आणि वाडीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्राम, दत्ताराम गोसावी यांच्या स्मरणार्थ आजी-आजोबा उद्यानाची निर्मिती करण्यात आली.या विकासकामांच्या निर्मितीसाठी मुंबई मंडळ, स्थानिक मंडळ तसेच लोकांनी दिलेली वर्गणी आणि वाडीतील तरुण तसेच सर्व ग्रामस्थ महिला यांनी श्रमदान करून आपापले योगदान दिले आहे. गणेश विसर्जन घाटाचे उद्घाटन वाडीचे प्रमुख मार्गदर्शक मुंबईचे निवृत्त तहसीलदार मोहन नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विनोद गोसावी, शरद गोसावी, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष शशांक गोसावी, सेक्रेटरी प्रदीप गोसावी, खजिनदार सुहास गोसावी, सतीश गोसावी, सिव्हील इंजिनिअर योगेश राऊळ, माजी सभापती राजेंद्र परब, कैलास गोसावी, दिनकर गोसावी, विनायक गोसावी, शामसुंदर गोसावी, काशिनाथ गोसावी, संतोष सावंत, समीर गोसावी, प्रभाकर गोसावी, पंकज गोसावी, जितेंद्र गोसावी, राजेंद्र गोसावी, तुषार गोसावी उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक दिनकर गोसावी आणि विनायक गोसावी यांच्या हस्ते फीत कापून आजी- आजोबा उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे तहसीलदार विनोद गोसावी यांच्या हस्ते याच उद्यानातील कधीही न आटणाऱ्या जलस्रोताचे पूजन करण्यात आले. (वार्ताहर)
पावित्र्य, स्वच्छता राखणे गरजेचे : अनिल भंडारी
आपल्या वाडीचे हे रोल मॉडेल संपूर्ण तालुक्यात पोहोचावे. याठिकाणी एक निसर्ग पर्यटनस्थळ सुरू होऊन वाडीच्या विकासाला चालना मिळेल. वाडीतील हा गणेशघाट आणि जलतरण तलाव तसेच आजी-आजोबा उद्यान वाडीतील आणि काळसे गावातील आबालवृद्धांसाठी कायम खुले राहील.
परंतु या ठिकाणचा वापर करताना येथील पावित्र्य आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या वाडीला तहसीलदार शरद गोसावी यांच्या माध्यमातून भेट देऊन या उपक्रमांची पाहणी केली आणि कौतुक केले.