आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:59 PM2018-04-19T15:59:02+5:302018-04-19T15:59:02+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते.
ओरोस : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते.
या आंदोलनाची तीव्रता वाढत असून एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. २१ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास या कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एनआरएचएम कर्मचाऱ्यांना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे, सेवेतील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासनाच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी असलेली वयाची अट शिथिल करावी, कामावर आधारित सुधारित गुण पद्धत बंद करावी. समान काम-समान वेतन कायदा लागू करावा, आरोग्य विभागाचे खासगीकरण करू नये, सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची गरोदर व प्रसुती रजा द्यावी, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी या कर्मचाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. २१ रोजी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला आपण स्वत: व आमदार नाईक उपस्थित राहून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही दिली.
या आंदोलनात आम्ही वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. २१ रोजी होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास आम्ही या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेऊ. तूर्तास आम्ही अतितत्काळ रुग्ण सेवा देत असून बाह्य रुग्ण सेवा पूर्णत: बंद केली असल्याचे डॉ. कृपा गावडे यांनी स्पष्ट केले.
रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही : डॉ. साळे
कामबंद आंदोलनात एनआरएचएम कर्मचारी सहभागी असले तरी नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्यास रुग्ण सेवेवर नक्कीच परिणाम होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले.