वेंगुर्लेत चुरस रंगणार

By admin | Published: October 30, 2016 11:48 PM2016-10-30T23:48:25+5:302016-10-30T23:48:25+5:30

नगरपरिषदेची निवडणूक : उमेदवारांची संख्या वाढली; १७ जागांसाठी ७५ उमेदवार

Vengurlate will play in the rounds | वेंगुर्लेत चुरस रंगणार

वेंगुर्लेत चुरस रंगणार

Next

 
प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली. १७ जागांसाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून येत्या २ नोव्हेंबरला होणाऱ्या उमेदवारांच्या छाननीत किती उमेदवारांचे अर्ज अवैध ठरतात हे लवकरच समजणार आहे. यावेळी सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये बदल करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षांनी दिलेल्या या संधीचा मतदार किती उपयोग करुन घेतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेले काही दिवस सुयोग्य उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले होते. शिवसेना-भाजप युती होईल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, ऐनवेळी युती न झाल्याने उमेदवारीसाठी तारांबळ उडाली.
परिणामी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवित नवीन चेहऱ्यांना संधी देत सतराही जागांवर आपले उमेदवार उभे केले. काँग्रेसनेही बऱ्यापैकी नव्यांनाच संधी देत १५ जागांवर उमेदवार दिले. तर मागच्या निवडणुकीवेळी निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव उमेदवार दाजी परब यांना यावेळी प्रशासनामार्फत देण्यात येणारे अधिकृत फॉर्म नसल्याने माघार घ्यावी लागली.
राष्ट्रवादी काँग्रेसने दोन नवीन चेहऱ्यांना संधी देत ७ उमेदवार उभे केले. यात पूर्वी काँग्रेसमधून लढलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये जुन्या अनभुवी उमेदवारांची संख्या जास्त आहे.
निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त दिसत होती.
संबंधित पक्षांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी घेणे, चर्चा आदी कार्यक्रम सुरु केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय काहींच्या पथ्यावर पडला.
पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर आधीच पक्षाकडून उमेदवारी आपल्याला मिळणार नसल्याची कुणकुण लागलेल्या उमेदवारांनी पक्षबदल करीत संबंधित पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पक्षनिष्ठा कायम ठेवून पक्षाकडून उमेदवारी अर्ज न मिळालेल्या उमेदवारांवर ‘हेचि फळ काय मम तपासी’ असे म्हणण्याची वेळ आली. एकंदरीत पक्ष बदलून, अपक्ष राहून नाराज उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. पण हे उमेदवार आपल्या मताशी ठाम राहतात की प्रलोभनांना बळी पडून उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार हे बहुतांशी नवीन असल्याने मतदारांनाही उमेदवार निवडणे कष्टाचे पडणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये आपलेच शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, समाजबांधव उभे रहात असल्याने पक्षांनाही याचा फायदा होणार आहे. मात्र, हा फायदा कोणता पक्ष करून घेतो, याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यामुळे प्रचारयंत्रणाही जोरदार सुरु होणार आहे. अधिकृत पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या चिन्हांचा वापर करणार आहेत. तर अपक्ष उमेदवार चिन्ह मिळेपर्यंत तूर्तास आपले नावच लक्षात ठेवण्यास सांगणार आहेत.

Web Title: Vengurlate will play in the rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.