वेंगुर्ले मुख्याधिका-यांची तडकाफडकी बदली, कर्जत नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 07:49 PM2017-11-16T19:49:53+5:302017-11-16T19:50:11+5:30

वेंगुर्ले : स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत वेंगुर्ले शहराचे नाव देशपातळीवर नेणारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली.

Vengurle chief's office transferred, Karjat Municipal Corporation orders | वेंगुर्ले मुख्याधिका-यांची तडकाफडकी बदली, कर्जत नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश

वेंगुर्ले मुख्याधिका-यांची तडकाफडकी बदली, कर्जत नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश

Next

वेंगुर्ले : स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत वेंगुर्ले शहराचे नाव देशपातळीवर नेणारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली. या अचानक झालेल्या बदलीमुळे वेंगुर्ले परिसरात खळबळ माजली असून, त्यांना तातडीने रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

रामदास कोकरे यांनी दोन वर्षांपूर्वी वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या काळात अनेक विकासात्मक कामेही केली होती. त्यांनी उघड्यावर शौचास बसणा-यांवर केलेली कारवाई ख-या अर्थाने वादग्रस्त बनली होती. त्यावेळी त्यांच्यावर टीकाही झाली होती. तसेच त्यांच्यावर नगरसेवकांना विकासकामात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही वेळोवेळी केला जात होता. नगरसेवक संदेश निकम यांनीही मध्यंतरी कोकरेंच्या बदलीची जोरदार मागणी केली होती.

मुख्याधिकारी कोकरे यांनी आपल्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले शहरात प्लास्टिक बंदी करून प्लास्टिक मुक्त केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प योग्य प्रकारे हाताळून येथील डंपिंग ग्राऊंडचा कायापालट केला. झिरो सॉलिड वेस्ट करून डंपिंग ग्राऊंडला स्वच्छ भारत पर्यटनस्थळ असे नाव दिले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेला महाराष्ट्रात तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. याबरोबरच हागणदारीमुक्त शहर, वसुंधरा पुरस्कार, उत्कृष्ट मुख्याधिकारी असे अनेक पुरस्कार त्यांच्या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेला मिळाले आहेत. गुरुवारी सकाळी नगरविकास खात्याने मुख्याधिकारी कोकरे यांच्या बदलीचे आदेश काढले. यात महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे अधिनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंधक अधिनियम २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) नुसार मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची बदली करण्यात येत असल्याचे सांगितले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत उपक्रमात कोकरे यांनी महत्त्वाचे योगदान देताना वेंगुर्ले शहराचे नाव राज्याबरोबरच देशपातळीवर चमकविले होते. कोकरे यांच्या या कामगिरीची दखल घेताना सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. कोकरे यांच्या बदलीमुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी केले होते कौतुक
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छ भारत योजनेत वेंगुर्लेचे नाव देशपातळीवर नेले होते. त्यांचे कौतुकही करण्यात आले होते. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही कोकरे यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यामुळे कोकरे जिल्ह्यात चर्चेत आले होते.
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अनेक विकासकामात अडसर निर्माण केला आहे. विकासाच्या कोणत्याच योजना पुढे केल्या जात नव्हत्या. तसेच अलिकडेच मच्छीमार्केटचा प्रश्न अगर गटाराचा प्रश्न असो स्थानिकांना विश्वासात न घेता कामे केल्यामुळे सर्वजण त्रस्त होते. आम्ही या विरोधात आवाजही उठविला होता. तसेच कोकरे यांच्या बदलीची मागणी केली होती. त्या मागणी प्रमाणेच शासनाने बदली केली आहे,  असे मत नगरसेवक संदेश निकम यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Vengurle chief's office transferred, Karjat Municipal Corporation orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.