वेंगुर्ले मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही
By admin | Published: April 16, 2015 09:21 PM2015-04-16T21:21:37+5:302015-04-17T00:22:47+5:30
सातार्डेकर यांचा इशारा : ...तर वेंगुर्लेची जनता रस्त्यावर उतरेल
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात मायनिंग कदापि होऊ देणार नाही. कारण या मायनिंगमुळे वेेंगुर्ले शहराचे अस्तित्वच नष्ट होणार आहे आणि वेंगुर्ले शहराचा विकास तर सोडाच, मायनिंगमुळे शहर भकास होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यांनी व्यक्त केले. रेडीपाठोपाठ आता वेंगुर्ले शहरात मायनिंगचा घाट घालण्यात येत आहे; परंतु वेंगुर्ले शहरात मायनिंग सुरू झाल्यास त्याला तीव्र विरोध होणारच आणि ते योग्यच आहे. आज वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथे कित्येक वर्षे मायनिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मायनिंगच्या जिवावर रेडी पोर्टसारख्या कंपन्यांनी करोडोची माया जमा केली; परंतु रेडी गावचा विकास का झाला नाही? असा सवाल सातार्डेकर यांनी केला आहे. सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून मायनिंगच्या हव्यासापोटी समुद्रसपाटीपासून खड्डे मारण्यात येत आहेत. हे मायनिंंग आताच रोखले नाही तर भविष्यात समुद्राचे पाणी रेडी गावात घुसून रेडीची अवस्था माळीण गावासारखीच होईल, यात काडीमात्र शंका नाही. त्यामुळे रेडीचे उदाहरण समोर असताना वेंगुर्लेत मायनिंग होऊच देणार नाही. तसेच लोकांची दिशाभूल करून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी हडप करून मायनिंगचा घाट घातला असेल आणि राज्य सरकार, संबंधित मंत्री व अधिकारी त्यांना मदत करीत असतील, तर वेंगुर्लेची जनता रस्त्यावर उतरेल. परंतु, वेंगुर्ले शहरात मायनिंग होऊ देणार नाही, असे मत सातार्डेकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)