वेंगुर्ले भाजपत जुने-नवे वाद उफाळणार!
By admin | Published: October 6, 2015 10:36 PM2015-10-06T22:36:46+5:302015-10-07T00:01:32+5:30
पद राखण्यासाठीच : नव्याने पक्षात दाखल झालेल्यांची पदासाठी मोर्चेबांधणी
वेंगुर्ले : केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर हा पक्ष जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. साहजिकच त्यामुळे इतर पक्षांतील अनेकांनी सत्तेतील पक्षात प्रवेश केला. यामुळे आजघडीला भाजपची ताकद वाढत आहे. आपल्याकडे पद राखण्यासाठी बहुतांशी प्रयत्नवादी आहेत. यातूनच पक्षात जुने-नवे असा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ले तालुक्यात अलीकडेच पक्षात प्रवेश मिळविणारे तालुक्याची सूत्रे हातात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी वरिष्ठ पातळीवरून करीत असल्याने भाजप जुन्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये साहजिकच नाराजीचे सूर उमटत आहेत.वेंगुर्ले तालुक्यात भाजप म्हणावा तसा प्रबळ नव्हता. मात्र, केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यावर तो आता जिल्हाभर प्रबळ होत आहे. वेंगुर्ले तालुक्यात आता सर्वच गावागावांत भाजप सदस्य नोंदणी उपक्रम राबविले जात असून, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालाची वाढ होत आहे. त्यामुळे पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग मतदारसंघांतून आमदारकीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांत मोठे पक्षांतर झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे दीपक केसरकर शिवसेनेत, तर राष्ट्रीय काँग्रेसचे राजन तेली भाजपत दाखल होऊन विधानसभेची निवडणूक त्या त्या पक्षाची तिकिटे मिळवून लढविली. याचवेळी त्यांच्याबरोबर त्यांचे काही खंदे समर्थकही काही अवधीत त्यांच्या पक्षात सामील
झाले. वेंगुर्ले तालुक्यात विद्यमान असलेल्या तालुकाध्यक्षांकडे पक्षनिरीक्षकपदाची धुरा वरिष्ठ पातळीवरील भाजप नेत्यांनी दिली असून, जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांकडे हे पद देऊन जणू नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना पदाची लॉटरीच दिली आहे, तर जुन्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे गाजर दाखवून अध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदे राजन तेली समर्थक मिळविण्याची मोर्चेबांधणी करीत आहेत. (वार्ताहर)
अंतर्गत वाद उफाळणार?
१५ नोव्हेेंबरपर्यंत होणाऱ्या
या अध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदावरून जुने-नवे असे अंतर्गत वाद उफाळणार, हे नक्की. कदाचित याचा परिणाम वेंगुर्ले भाजपत खोलवर होईल. या वादातून पक्ष बांधणीस बाधा
येणार का, हे येणारा काळच ठरवेल.
तेली समर्थकांची जुन्यांना भीती
अलीकडेच पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांच्याकडे राज्य चिटणीस पदाचा कार्यभार असल्याने पक्षात आणि वरिष्ठ पातळीवरील मंत्र्यांशी त्यांचे चांगले वजन असल्याने त्यांच्या समर्थनातील व्यक्तीला अध्यक्षपदी विराजमान करून याच पद्धतीने जिल्ह्यातही आपल्याच समर्थकांची वर्णी लावणार, हे साहजिकच आहे.
त्यामुळे जुने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते दुय्यम स्थानावर फेकले जाणार आहेत. एरव्ही वरिष्ठ पातळीवर भाजप निर्णयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मतभेद असतात. मात्र, तालुकास्तरावर पक्षीय राजकारणात कुणीच दखल घेत नसल्याने या निवडीवर त्यांच्या मनाचा विचार होणार नाही.