वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी १0 जूनला निवडणूक

By admin | Published: June 1, 2014 12:52 AM2014-06-01T00:52:14+5:302014-06-01T00:52:31+5:30

अध्यक्षांचा अडीच वर्षांचा पहिला कालावधी समाप्त

Vengurlee elections to be held on June 10 | वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी १0 जूनला निवडणूक

वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी १0 जूनला निवडणूक

Next

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षांचा पहिला कालावधी समाप्त झाल्याने पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरिता वेंगुर्ले नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक १० जून रोजी दुपारी १२ वाजता वेंगुर्ले नगरपरिषद सभागृहात विशेष सभा घेऊन घेण्यात येणार असल्याचे आदेश सिंंधुुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सर्व नगर परिषद सदस्यांना काढले आहेत. यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी खुले प्रवर्ग आरक्षण असल्याने नगराध्यक्षपदी कोण विराजमान होतो, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. वेंगुर्ले नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा पहिला कालावधी समाप्त होत असल्याने जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी नगर परिषदेच्या सर्व सदस्यांना १० जून रोजी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी (महसूल) कणकवली यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केल्याचे कळविले आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ जून रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्या समोर स्वत: जातीने नामनिर्देशन पत्र द्यावयाचे आहे. तर नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारास ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अपिल करता येणार आहे. अपिलाची मुदत संपल्यानंतर अपिलावरील निर्णय विचारात घेऊन नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी नगर परिषदेच्या सूचना फलकावर त्याच दिवशी लावण्यात येणार आहे. ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. १० जून रोजी पीठासीन अधिकारी वैधपणे प्राप्त झालेल्या आणि उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखवून हात उंचावून मतदान घेण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी १० जून रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वत: जातीने मुख्याधिकारी यांनी सादर करावयाचे आहे. अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेवर राष्टÑवादीची सत्ता असूनही सत्ताधिकार्‍यांतच दोन गट पडल्याने गेल्यावेळी बंडखोर गटाच्या डॉ. पूजा कर्पे या अध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. त्याच गटाचे वामन कांबळे हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रता ठरविण्याबाबत दावे दाखल केले होते. याबाबतचा निर्णय अद्याप लागलेला नाही. आता होणार्‍या निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असल्याने दोन्ही गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की, मागील निवडणुकीप्रमाणे गटबाजीचे राजकारण करणार, याबाबत पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vengurlee elections to be held on June 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.