वेंगुर्लेत मिळतेय फणसाचे आईस्क्रीम- : ग्राहकांकडून मनमुराद आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 08:46 PM2019-05-08T20:46:52+5:302019-05-08T20:47:28+5:30
उन्हाळा म्हटला की, प्रकर्षाने आठवण होते ती शीतपेयांची किंवा आईस्क्रीमची. प्रचंड उकाड्यातून शरीराला थंडावा मिळण्यासाठी शीतपेये किंवा आईस्क्रीमची खरेदी केली जाते. अलीकडे वेगवेगळ््या कंपन्यांनी विविध प्रकारचे आईस्क्रीम बाजारात आणले आहेत.
प्रथमेश गुरव ।
वेंगुर्ले : उन्हाळा म्हटला की, प्रकर्षाने आठवण होते ती शीतपेयांची किंवा आईस्क्रीमची. प्रचंड उकाड्यातून शरीराला थंडावा मिळण्यासाठी शीतपेये किंवा आईस्क्रीमची खरेदी केली जाते. अलीकडे वेगवेगळ््या कंपन्यांनी विविध प्रकारचे आईस्क्रीम बाजारात आणले आहेत. असे असले तरी वेंगुर्ले येथील राजाराम लोणे व राधिका लोणे यांनी फणसापासून बनविलेल्या आईस्क्रीमला चांगली पसंती मिळत असून, या आईस्क्रीमचा ग्राहक मनमुराद आस्वाद घेत आहेत.
एप्रिल-मे महिन्यांत बरीच फळे बाजारात विकायला येतात. यातील बरीच फळे पौष्टिक गुणधर्म असलेली असतात. दिवसेंदिवस या फळांवर विविध प्रकारे प्रक्रिया करून ती बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. बाहेरून काटेरी आवरण व आत रसाळ असलेला फणस कोकणात कोठेही दृष्टीस पडतो. संतांनीसुद्धा ‘फणसाअंगी काटे। आत अमृताचे साठे’ अशा प्रकारे एका अभंगात फणसाची महती सांगितली आहे. फणसापासून लोणचे, जॅम, जेली, फणस पोळी, चिवडा, चिप्स, पेय, आदी पदार्थ बनविले जातात. या उत्पादनांना बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. तसेच फणसामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे आहेत. यामध्ये ‘अ’, ‘क’ ही जीवनसत्त्वे, थियामीन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लाविन, नियासिन आणि झिंकसारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे.
अशा या बहुपयोगी फणसाच्या पारंपरिक उत्पादनांना फाटा देत त्याचा आस्वाद वेगळ्या पद्धतीने कसा घेता येईल, या विचारात असतानाच वेंगुर्ले-दाभोसवाडा येथील राजाराम लोणे व राधिका लोणे या दाम्पत्याला फणसाच्या आईस्क्रीमची कल्पना सूचली. या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन त्यांनी फणसाच्या आईस्क्रीमची निर्मिती केली आहे.
मोती तलाव उत्सवातही प्रतिसाद
कोणतीही कृत्रिम रसायने न वापरता एका लाकडाच्या ड्रममध्ये हाताने हे आईस्क्रीम बनविले जाते. लोणे दाम्पत्याने आपल्या कल्पकतेतून बनविलेल्या या फणसाच्या आईस्क्रीमची ग्राहकांना चांगलीच भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी येथे झालेल्या मोती तलाव महोत्सवात लोणे दाम्पत्याने फणसाच्या आईस्क्रीमचा स्टॉल लावला होता. ग्राहकांनी या स्टॉलला भेट देत फणस आईस्क्रीमचा आस्वाद घेतला.
निसर्गाने आपल्याला औषधी गुणधर्म असलेली फळे दिली आहेत. अशा फळांचा बारकाईने अभ्यास केल्यास फणस आईस्क्रीमसारखी नावीन्यपूर्ण उत्पादने आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे हंगामी रोजगारही मिळेल.
- राजाराम लोणे, वेंगुर्ले