वेंगुर्लेत तालुकास्तरीय साहित्य संमेलन
By admin | Published: January 23, 2015 09:10 PM2015-01-23T21:10:57+5:302015-01-23T23:38:27+5:30
१४, १५ फेब्रुवारी : संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीत निर्णय
वेंगुर्ले : सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ले तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजन येथील साई मंगल कार्यालयात केले आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. हे साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य परिषद, वेंगुर्ले शाखा, शिक्षक वाङ्मय चर्चा मंडळ, किरात, माध्यमिक मराठी शिक्षक संघ, वेंगुर्ले या सहयोगी संस्थांच्या सहकार्याने होणार आहे.वेंगुर्ले सातेरी मंदिर येथील जनसेवा हॉलमध्ये कार्यक्रमाच्या संयोजिका तथा लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खर्डेकर महाविद्यालयाचे
प्रा. आनंद बांदेकर, प्रा. सचिन परूळकर, दाभोली हायस्कूलचे दादा सोकटे, वेंगुर्ले हायस्कूलचे पी. एन. सामंत, अमर तांडेल, नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा तोरसकर, गुरुदास तिरोडकर, महेश राऊळ, रफिक शेख, प्रशिक्षक सागर परब, रवींद्र वारंग, चैतन्य दळवी, महेंद्र घाडी, सुरेश कौलगेकर, सचिन वराडकर, आदी उपस्थित होते. या संमेलनाची सुरुवात ग्र्रंथदिंडीने करून, या ग्रंथदिंंडीत वेगवेगळ्या साहित्याच्या कल्पना मांडण्यात येणार आहेत. या दिंडीला शोभा यात्रेचे स्वरूप दिले जाणार आहे. संमेलनामध्ये साहित्यिकांच्या रांगोळी तसेच विविध स्पर्धा घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. (प्र्रतिनिधी)
लोगो पाठविण्याचे आवाहन--वेंगुर्लेत प्रथमच तालुकास्तरीय साहित्य संमेलन होत असल्याने या संमेलनाचा लोगो वेंगुर्लेतील निसर्ग, उत्पादने, संस्कृती व इतिहास तसेच साहित्याचे दर्शन घडविणारा, असा सर्वसमावेशक बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोगो बनवून २६ जानेवारीपर्यंत लोगो पाठवायचा आहे. या स्पर्धेतील विजेत्यास सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी सुरेश कौलगेकर, बी. के . रोड, वेंगुर्ले या पत्त्यावर लोगो पाठवावा.
साहित्यिक ओळख जपण्याचा प्रयत्न--वेंगुर्लेत तालुकास्तरीय साहित्य संमेलनात उदयोन्मुख लेखक व कवी यांना व्यासपीठ मिळणार आहे. वेंगुर्ले तालुक्याला संस्कृती, ऐतिहासिक तसेच साहित्याचा मोठा वारसा आहे.
वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर यासारखे अनेक लेखक व साहित्यिक तसेच कवी या तालुक्यातीलच असल्याने त्यांची ओळख या साहित्य संमेलनातून वाचक व रसिकांना होण्याचा या संमेलनातून प्रयत्न केला जाणार आहे.
या सर्व साहित्यिकांची एकत्रित माहिती संंकलित करून त्याचे प्रदर्शन या संमेलनात मांडले जाणार आहे.