सिंधुदुर्गातील सातारड्याच्या माजी सरपंचांची गळफास घेत आत्महत्या
By अनंत खं.जाधव | Published: March 22, 2023 05:59 PM2023-03-22T17:59:19+5:302023-03-22T17:59:36+5:30
सावंतवाडी : सातार्डा येथील माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (वय ८९) यांनी आपल्या घरासमोरील फणसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या ...
सावंतवाडी : सातार्डा येथील माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (वय ८९) यांनी आपल्या घरासमोरील फणसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आज, बुधवारी सकाळी उघडकीस आला. त्यांनी पहाटे आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मांजरेकर यांना गेले काही दिवस डोळ्यांनी दिसत नव्हते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांनी बारा वर्षें सातार्डा गावचे सरपंचपद भूषविले होते. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरु होते. दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना अस्पष्ट दिसत होते.
या घटनेची माहिती मुलगा महेंद्र मांजरेकर यांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर यांचे ते वडील होत.