सिंधुदुर्ग : नियोजन सभेत 'या' विषयावरून राणे-पारकर-धुरी यांच्यात शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 06:16 PM2021-11-16T18:16:52+5:302021-11-16T18:22:12+5:30
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी कधी आक्रमक पणे तर कधी उलट सुलट चिमटे काढत सभागृहातील वातावरण खेळते ठेवले. मात्र यावेळी प्रतिभा डेअरी वरून संदेश पारकर मंत्री राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले
ओरोस : बर्याच कालावधीनंतर होणारी नियोजन सभा वादळी होणार म्हणून सर्वच प्रशासन धीर गंभीर होते. मात्र प्रत्यक्ष सभेत उलटेच घडल्याने सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी कधी आक्रमक पणे तर कधी उलट सुलट चिमटे काढत सभागृहातील वातावरण खेळते ठेवले. मात्र यावेळी प्रतिभा डेअरी वरून संदेश पारकर मंत्री राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. तर 'शिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात का' या वृत्तपत्राच्या कात्रणावरून केंद्रीय मंत्री राणे यांनी विचारलेल्या प्रश्नावरून आमदार नितेश राणे व बाबूराव धुरी शाब्दिक चकमक झाली.
सिंधुदुर्ग नियोजन सभा बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परीषद निधी मागे गेल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तर प्रतिभा डेअरी कडून शेतकऱ्याचे पैसे थकवण्यात आले यावर सदस्य संदेश पारकर व मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अपंग कल्याण निधी वरून ही अकुश जाधव यांनी पालकमंत्री सामंत यांना कोडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी श्वेता कोरगावकर यांनी तालुका क्रीडांगण हे बांदा ऐवजी सावंतवाडीत नेण्यात आले त्यावरून सभागृहाचे लक्ष वेधत ते पुन्हा बांदा येथे आणा अशी मागणी केली. पण त्यावर पालकमंत्री सामंत यांनी शासन अध्यादेश हा तालुकास्तरीय आहे मग जागा जर सावंतवाडीत दिली असेल तर बांदा येथे देता येणार नाही असे सांगितले. त्यावर बांदा गावावर अन्याय असल्याचे आमदार राणे म्हणाले.
सभा खेळीमेळीत होत असतनाच मंत्री राणे यांनी शिवसेना प्रवेशासाठी आपण जिल्हा नियोजन मधून निधी देता का अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्याबाबत सामंत यांना विचारले असता त्यावरून सदस्य धुरी तसेच जान्हवी सावंत आक्रमक झाल्या. धुरी यांनी हा विषय सभागृहाच्या बाहेरचा आहे म्हणत विरोध केला. मात्र आमदार राणे यांनी धुरी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार राणे व धुरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मात्र यात पालकमंत्री सामंत यांनी हस्तक्षेप करत कोणीही वाद करू नका मी उत्तर देण्यास सक्षम आहे असे म्हणत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले.
आयत्या वेळच्या विषयावर धुरी यांनी कळणे मायनिंग मुळे झालेला अन्याय यावर आपले मत मांडले हे मायनिंग बंद करा असा ठराव घ्या असे नमूद केले पण राणे यानी याला नकार दिला.यावेळी आमदार केसरकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, दादा कुबल आदिनी आयत्या वेळच्या चर्चेत भाग घेतला.
राणेंनी निभावली प्रति अध्यक्षाची भूमिका
नियोजन बैठक वादळी होणार असे वाटत असतानाच केंद्रिय मंत्री राणे यांनी प्रति अध्यक्ष पदाची भुमिका निभावत आपल्या अनेक सदस्याना थोडक्यात बोलण्यास सागितले तर काहिना खाली बसवले त्यामुळेच लाबणारी बैठक थोडक्यात आटोपती घेतली मात्र सभा वादळी न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.