सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत राणे-राऊतांमध्ये शाब्दिक चकमक; राणे-केसरकरांचे सूर जुळले
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 4, 2022 06:45 PM2022-11-04T18:45:13+5:302022-11-04T18:46:00+5:30
खासदार विनायक राऊत यांनी सभेचे अध्यक्ष कोण आहे आणि नेमकं मिटिंग कोण चालवतंय, असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला.
सिंधुदुर्ग : दिवाळी संपत आली तरी फटाके फुटण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. दिवाळीपाठोपाठ जिल्ह्यात राजकीय फटाके फुटत असल्याचे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसून आले. या बैठकीत काही मुद्द्यांवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवी सरकार झाल्यानंतर पहिलीच सभा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.
नियोजन समितीची सभा सुरू झाल्यानंतर १ एप्रिल २०२२ पासूनच्या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली असल्याचे सांगत या कामांची खासदार राऊत यांनी सभेत माहिती मागितली. मात्र, या विषयाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेत सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालावे. कोणाच्या काही सूचना असतील तर त्या आयत्यावेळी येणाऱ्या विषयांमध्ये घेण्यात याव्यात, अशी सूचना सभाध्यक्षांना केली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सभेचे अध्यक्ष कोण आहे आणि नेमकं मिटिंग कोण चालवतंय, असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला. त्यानंतरही खासदार राणे बोलत राहिले. यावरून केंद्रीय मंत्री राणे आणि खासदार राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकला.
राणे - केसरकर यांचे सूर जुळले
खासदार विनायक राऊत हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या आक्षेपावर भाष्य करीत असताना केंद्रीय मंत्री राणे आणि मंत्री केसरकर यांच्यात दबक्या आवाजात काही चर्चा झाली. यात दोघेही एकमेकांशी बोलताना गालातल्या गालात हसत होते. त्यामुळे राणे यांनी केसरकर यांचे सूर जुळले की काय असे वाटत होते. त्यानंतर राणे यांनी मंत्री चव्हाण आणि केसरकर यांनी जिल्हा नियोजनच्या निधीमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.