दिग्गजांना नव्या उमेदवारांचे आव्हान

By Admin | Published: November 16, 2016 12:19 AM2016-11-16T00:19:31+5:302016-11-16T00:19:31+5:30

वेंगुर्ले नगर परिषद निवडणूक : प्रभाग चारमधील लढत होणार रंगतदार; दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

Veterans challenge new candidates | दिग्गजांना नव्या उमेदवारांचे आव्हान

दिग्गजांना नव्या उमेदवारांचे आव्हान

googlenewsNext

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ४ मध्ये माजी चार दिग्गज नगरसेवकांसमोर दमदार नव्या उमेदवारांची ‘एंट्री’ झाल्याने या प्रभागात लढत रंगतदार होणार आहे. या प्रभागातून दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एका जागेसाठी चार, तर सर्वसाधारण एका जागेसाठी तब्बल सात उमेदवार लढत देत आहेत. मात्र, दिग्गजांच्या मांदियाळीत मतदार राजा कोणाला कौल देतील, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग ४ मध्ये १ व ७ वॉर्ड येत असून, उत्तरेकडून दाभोली डोंगर सर्व्हे नं. ७४ पूर्व तांबळेश्वर रस्ता ते गाडीअड्डा रस्त्याच्या पश्चिम बाजूने भाजी मार्केट रस्ता ते राम मारुती रस्त्याच्या पश्चिम बाजूने नाथ पै रस्त्यालगत व पुढे रामेश्वर गल्लीपर्यंत, दक्षिण रामेश्वर गल्ली ते वाडकर जंक्शनपर्यंत, उत्तर बाजू पिराचा दर्गा तिठ्यापर्यंत, पश्चिम दाभोली डोंगरापासून गिरपवाडा रस्त्याच्या पूर्व बाजूने पुढे खर्डेकर रस्त्यापासून पिराचा दर्गा गल्लीच्या पूर्व बाजूने नाथ पै रस्त्यापासून पुढे वाडकर गल्ली जंक्शनपर्यंत असा भाग येतो. या प्रभागात ४५६ स्त्रिया व ४५० पुरुष मिळून ९०६ मतदार आहेत. प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून कृपा भालचंद्र गिरप, भारतीय जनता पक्षाकडून संगीता सदानंद पांजरी, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका गीता गजानन अंधारी, तर शिवसेनेकडून भाग्यश्री रमाकांत कुडतरकर रिंगणात आहेत. अंधारी राजकारणात जुन्या असून, काँग्रेसच्या कृपा गिरप, शिवसेनेच्या भाग्यश्री कुडतरकर व भाजपच्या संगीता पांजरी राजकारणात ‘फ्रेश’ असल्या तरी टक्कर देण्यास समर्थ आहेत. याच प्रभागातून सर्वसाधारण जागेसाठी सात उमेदवार लढत देणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसकडून महेश सूर्यकांत डिचोलकर, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक अवधूत शिवराम वेंगुर्लेकर, शिवसेनेकडून विवेकानंद शशिकांत आरोलकर, भाजपकडून नरेश मोहन गावडे, तर अपक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष अभिषेक राजीव वेंगुर्लेकर, माजी उपनगराध्यक्ष व भाजपशी बंडखोरी केलेले चंद्रशेखर लक्ष्मण कोयंडे आणि सुहास पांडुरंग मांजरेकर निवडणूक रिंगणात
उतरले आहेत. माजी नगरसेवकांचा भरणा असलेल्या या प्रभागात नवे सक्षम उमेदवार निवडणूक लढवित असल्याने येथे चुरशीची लढत होणार हे नक्की! मात्र या जागेसाठी महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत.
भाजपशी बंडखोरी केलेले चंद्रशेखर कोयंडे हे माजी उपनगराध्यक्ष, तर माजी नगरसेवक गीता अंधारी व अवधूत वेंगुर्लेकर यांना राजकीय अनुभव आहे. मागील निवडणुकीत मनसेकडून लढलेले अभिषेक वेंगुर्लेकर यांना ५९७ मताधिक्य मिळाले होते. यावेळी ते अपक्ष उमेदवार झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अवधूत वेंगुर्लेकर यांना ८४३ मते मिळाली होती.
मात्र, यावेळी त्यांना नवोदित उमेदवारांचा अडथळा आहे. काँग्रेसचे महेश डिचोलकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवसेनेचे विवेकानंद आरोलकर यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांची साथ आहे, तर भाजपच्या नरेश गावडे यांना राजकीय वारसा आहे. मात्र, मर्यादित (९०६) मतदार असलेल्या या प्रभागात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एक-एक मत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतांसाठी व्यूहरचना आखत आहेत. वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. (वार्ताहर)
एक दिवसाचे नगराध्यक्ष पुन्हा रिंगणात
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या राजकीय घडामोडीत माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर हे एक दिवसाचे प्रभारी नगराध्यक्ष होते. यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी रिंंगणात आहेत. त्यांचेही विरोधकांना तगडे आव्हान आहे.

Web Title: Veterans challenge new candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.