केर गावात माकड तापाचा बळी
By admin | Published: January 26, 2016 12:03 AM2016-01-26T00:03:12+5:302016-01-26T00:03:12+5:30
आणखी दोघांना लागण
साटेली भेडशी : केर गावात विचित्र प्रकारच्या तापसरीने अखेर पहिला बळी घेतला. बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उमेश कृष्णा देसाई (वय ३८) या तरुणाचा या विचित्र तापाने रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. केर गावातील दोघांना माकड तापाची लागण झाली असल्याचे यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर हा पहिला बळी गेल्याने केर परिसरात या तापसरीने दहशत पसरली आहे.
आठ दिवसांपूर्वी केर गावात अचानक तापसरीची साथ आली. एकाच गावात जवळपास १५ ते २० जणांना या विचित्र तापाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना साटेली-भेडशी व दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी उमेश देसाई हे अत्यवस्थ असल्याने त्यांना बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. रविवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ व आई असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वीच उमेश देसाई यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घरातील कर्ता पुरुष म्हणून उमेश देसाई यांच्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. मात्र, त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने देसाई कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दोघांना माकड तापाची लागण
केर गावात आढळलेल्या तापसरीच्या रुग्णांमध्ये सांधेदुखी, डोके जड होणे, हात-पाय दुखणे, आदी लक्षणे आढळली होती. त्यामुळे सुरुवातीला डेंग्यूची साथ असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यापैकी काहींना बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले होते. गोव्यात उपचार सुरू असलेल्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी दोघांना माकड तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)