बळीराजा वन्यप्राण्यांमुळे त्रस्त

By admin | Published: May 16, 2016 12:20 AM2016-05-16T00:20:18+5:302016-05-16T00:23:32+5:30

दोडामार्गमधील स्थिती : प्राण्यांकडून लाखोंची नुकसानी, भरपाई मात्र हजारात

The victims of wild animals suffer from wildlife | बळीराजा वन्यप्राण्यांमुळे त्रस्त

बळीराजा वन्यप्राण्यांमुळे त्रस्त

Next

वैभव साळकर / दोडामार्ग
तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा लहरीपणा, भातशेती करताना मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा होणारा जादा खर्च आदीमुळे त्रस्त झालेला दोडामार्गातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात काजू, नारळ, आंबा, केळी या फळझाडांबरोबरच बांबू लागवड करू लागला आहे. मात्र, या फळझाडांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. गवारेडे, रान डुक्कर, सांबर व माकड आदी वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई मात्र शासन तुटपुंजी देण्यात येत आहे. त्यामुळे हत्तीसंकटानंतर आता बळीराजा शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुन्हा एकदा कोलमडतो आहे.
तालुक्यातील कित्येक हेक्टर भातशेती योग्य जमीन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी ठरत असल्याने वापराविना पडून आहे. पावसाचा लहरीपणा, नांगरणी, रासायनिक खते यांच्यावर खर्च करावा लागणारा पैसा तसेच या शेतीची देखभाल आदींचा ताळमेळ घालता मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी भातशेती करण्याचे केव्हाच सोडून दिले आहे. शेतकऱ्यांनी फळ बागायतीकडे वळावे, यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात असून, याकरिता शंभर टक्के अनुदान फलोत्पादन योजनाही राबविली गेली. या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकरी आपल्या डोंगर कपारीतील जमिनीत काजू, आंबा आदींची लागवड मोठ्या प्रमाणात करताना आढळून येतात. या जमिनीत फळ झाडांची लागवड करण्यात आली.
आंबा, काजू, नारळ आदीसह अनेक फळझाडांच्या संकरीत जाती तयार करून कमीतकमी वेळेत ही फळझाडे उत्पादन देण्यास सुरूवात करतील, असा प्रयत्नही कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळेच काजू कलमे लागवडीच्या तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन देण्यास सुरूवात होते. तालुक्यात केरळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून, या शेतकऱ्यांनी येथील जमिनी खरेदी करून अनेक फळझाडांची लागवड केली आहे. याच धर्तीवर तालुक्यातील शेतकरी योग्य पध्दतीने फळझाडे लावताना आढळून येतात व त्याची जोपासनाही तितक्याच मेहनतीने घेत आहेत.
तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळाबागायती करतानाच आपल्या बागायतीमधील जमिनीचा प्रत्येक भाग लागवडीखाली कसा येईल, याच प्रयत्नात असतो. त्यामुळे फळबागायतींच्या चारही बाजूच्या कंपाऊंडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करताना आढळून येते. बाजारपेठेत दिवसेंदिवस बांबूची वाढती मागणी व व्यावसायिकांना जाणवत असणारी बांबूची कमतरता आदीमुळे बांबूला आज बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव निर्माण झाला आहे. बांबूचे उत्पादन शेतकरी बारमाही घेत असल्याने या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल जाणवतो. मात्र, तालुक्यात वाढलेल्या माकडांच्या उच्छादामुळे येथील बांबूचे उत्पादन धोक्यात आले असून, शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भातशेतीकडून फळझाडांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळला असला, तरी या शेतीतही त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. फळबागायतीची नुकसान जंगली प्राण्यांकडून झाल्यास त्याची भरपाई शासन देते. मात्र, ती अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना ती मिळूनही न मिळाल्यासारखीच आहे. त्यामुळे या नुकसान भरपाईत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: The victims of wild animals suffer from wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.