गोव्यातील विजय सामान्य कार्यकर्त्यांचा अन् जनतेचा - भाजप प्रदेशाध्यक्ष तानवडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:14 PM2022-05-03T19:14:11+5:302022-05-03T19:15:36+5:30
काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले.
सावंतवाडी : गोव्यातील विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विजय आहे. गोव्यात भाजपचे सरकार येणार हे मी पूर्वीच सांगितले होते. सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे मत गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गोव्यात येऊन चांगले काम केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
ते कोल्हापूर हून गोव्याकडे जात असताना काही काळ सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याचे भाजप पदाधिकारी पुखराज पुरोहित यांनी स्वागत केले.
तानवडे म्हणाले, गोव्यात भाजप सरकार येणार हे निश्चित होते. गेली दोन वर्षे आम्ही ग्रामीण भागात काम करत होतो. सर्व पंचायत तसेच नगर पालिकेतील यश यामुळेच आम्हाला विजयाची खात्री होती. मात्र काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात काम करत असतना जनतेने विश्वास दिला होता त्याच जोरावर भाजप चे सरकार पुन्हा येणार हे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला काम करण्याची मोकळीक दिली त्यामुळेच हे सर्व शक्य झाले गोव्यातील काही नेते सोडून गेले त्यामुळे एक दोन जागा गेल्या त्यामुळेच २२ पल्सचा नारा दोन जागानी मागे पडला अन्यथा चमत्कार घडला असता असेही तानवडे म्हणाले.