साऱ्यांचेच डोळे पाणावले... व्हिडीओ कॉलवरून पत्नीने घेतले पतीचे अंत्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 06:52 AM2020-04-17T06:52:28+5:302020-04-17T16:01:12+5:30
गावापासून पाचशे किमी अंतरावर मुंबईत पतीचे निधन; लॉकडाऊनमुळे पत्नी मुकली अंत्यसंस्काराला
सचिन खुटवळकर/
दोडामार्ग - पत्नी कोकणात गावाकडे आणि पती ५00 किलोमीटर अंतरावर अंधेरी-मुंबई येथे. दुर्दैवाने पतीचा अल्पशा आजाराने मुंबईत मृत्यू झाला आणि गावाकडे असलेल्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अंत्यदर्शनासाठी मुंबईत जावे, तर लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हते. अखेरीस ग्रामस्थांनी मुंबईत बांदेकर कुटुंबियांशी चर्चा करून व्हिडीओ कॉलवरून त्या महिलेला पतीचे अंत्यदर्शन घडविले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावातील बांदेकर कुटुंबीय मुंबईत राहतात. चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर हे ६७ वर्षीय गृहस्थ पत्नी, दोन मुलगे, दोन सुना व नातवंडांसह तेली गल्ली, अंधेरी पूर्व येथील रहिवासी. मुंबईत राहत असले, तरी निवृत्तीनंतर गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अधूनमधून ते पत्नीसह गावाकडे यायचे. शिमगोत्सवापूर्वी ते गावात आले होते. चैत्र महिन्यात रामनवमी उत्सवासाठी पुन्हा यायचे असल्याने पत्नीला गावाकडे ठेवून ते मुंबईला रवाना झाले. मात्र तत्पूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले व त्यांना रामनवमीला येता आले नाही. तसेच पत्नीही गावातच अडकून पडली. दरम्यानच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून त्यांचा संवाद सुरू होता.
गुरुवारी दुपारी दोन वाजता चंद्रकांत बांदेकर यांचे अल्पशा आजाराने अंधेरी येथे निधन झाल्याची वार्ता गावात थडकली. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचे पार्थिव ना गावाकडे नेणे शक्य होते, ना त्यांच्या पत्नीला मुंबईला जाणे शक्य होते. अशा अवघड स्थितीत पतीच्या अंत्यदर्शनासाठी त्यांची पत्नी टाहो फोडत होती. अखेरीस मुंबईहून त्यांच्या सुनेने काळजावर दगड ठेवून दु:ख बाजूला सारत एका ग्रामस्थाच्या स्मार्टफोनवर व्हिडीओ कॉल केला. पतीच्या पार्थिवाचे दर्शन होताच पत्नीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. मुंबईत राहायला असूनही चंद्रकांत बांदेकर हे गावातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यात आवर्जून सहभागी होत असत. उत्तम नाट्यकलाकार व दिग्दर्शक म्हणून ते परिचित होते, अशी माहिती सरपंच महादेव गवस यांनी दिली.
नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे