दक्षता समितीची पुनर्रचना करावी
By admin | Published: October 1, 2016 11:51 PM2016-10-01T23:51:29+5:302016-10-02T00:11:14+5:30
नीतेश राणे : सभेत नोंदवला आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहाराची सूचना
वैभववाडी: दक्षता समितीत ‘आमदार नियुक्त’ सदस्यांचा समावेश केला गेला नसल्याने आमदार नीतेश राणे यांनी दक्षता समिती नियमबाह्य असल्याचा आक्षेप सभेत नोंदविला. तसेच समितीच्या पुनर्रचनेबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची सूचना समिती सचिव तथा तहसीलदार संतोष जाधव यांना दिली.
शुक्रवारी तहसीलदारांनी आपल्या अधिकारात आयोजित केलेल्या सभेचे आमंत्रण नसल्याने आमदार राणे यांनी जाधव यांना फैलावर घेत सभा रोखली होती. त्यामुळे ती सभा शनिवारी आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेला सभापती शुभांगी पवार व गटविकास अधिकारी मिलिंद जाधव तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, उपसभापती बंड्या मांजरेकर, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, नगरपंचायत शिक्षण सभापती अक्षता जैतापकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे यांनी समितीच्या रचनेबाबत विचारणा केली. त्यावेळी पुरवठा निरिक्षक स्वप्नील प्रभू यांनी दक्षता समितीच्या रचनेसंबंधीचे शासन परिपत्रक वाचून दाखवले. त्यावेळी ही समिती कोणी गठीत केली? समितीत आमदार नियुक्त सदस्य कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी तहसीलदार जाधव यांना केला. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून समितीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचे तहसीलदार संतोष जाधव यांनी सांगितले. त्यामुळे समितीत रास्त धान्य दुकानदारांचा प्रतिनिधीही नाही. मग त्यांच्या अडचणी कोण मांडणार? असा प्रश्न उपस्थित करून ही समिती नियमबाह्य आहे. त्यामुळे दक्षता समितीच्या रचनेबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची सूचना तहसीलदार संतोष जाधव यांना केली.
तालुक्याला मंजूर कोट्याप्रमाणे केरोसिन व धान्य पुरवठा केला जातो का? अशी विचारणा आमदार राणे यांनी केली. त्यावर पुरवठा निरीक्षक प्रभू यांनी धान्य पुरेसे येते. मात्र, केरोसिनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची सूचना आमदार राणे यांनी केली. सभेला भाजप व शिवसेनेचे समिती सदस्य अनुपस्थित राहिले. (प्रतिनिधी)
हा तर जनतेचा हक्कभंग!
धान्य वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांच्या समस्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाने दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. परंतु, शासन निर्णयानुसार येथील दक्षता समितीची रचनाच झालेली नाही. हा जनतेच्या हक्काचा भंग आहे. त्यामुळे या समितीच्या रचनेबाबत पत्रव्यवहार करा, चर्चाही करा. गरज असेल तर मला सांगा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हाधिका-यांना मीसुद्धा भेटेन, असे आमदार नीतेश राणे यांनी तहसीलदार संतोष जाधव यांना सांगितले.