शिमग्यातील सोंगाना मतदारच हद्दपार करतील
By admin | Published: April 1, 2016 10:54 PM2016-04-01T22:54:43+5:302016-04-02T00:06:04+5:30
विनायक राऊत : कुडाळ नगरपंचायतीच्या शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कुडाळ : कुडाळवासीयांना दादागिरी थाटातले नगरसेवक नको आहेत तर भगव्यातील निष्ठावंत कार्यकर्ते पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या शिवसेना प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले. शिमग्यातील सोंगाना येथील सुज्ञ मतदार हद्दपार करतील, असा टोला विरोधकांना लगावत नारायण राणे यांची राजवट ही लोकांना लुबाडणारी ठरली असेही ते म्हणाले.
कुडाळ नगरपंचायतीच्या शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, भाई गोवेकर, संजय पडते, मंदार शिरसाट, राजन नाईक, नागेंद्र परब, बबन बोभाटे, अनारोजीन लोबो, प्रकाश परब, राजन पोकळे, प्रशांत राणे, जीवन बांदेकर, अतिन शिरसाट तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, कोणतेही विकास काम न केलेली येथील शिमग्यांची सोंगे या निवडणुकीत नाचत आहेत. शिवसेनेच्यावतीने आम्ही विकास करणार आहोत. भविष्यात अनेक विकासकामे करायची आहेत. विकास हा पूर्णपणे शिवसेनाच करू शकते. यामुळे येथील जनता ही १00 टक्के आमचेच उमेदवार निवडून देतील असा विश्वासही व्यक्त केला.
स्वत:ला सम्राट समजणाऱ्या नारायण राणे यांनी कुडाळची पूर्णपणे वाट लावली. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी त्यांची वृत्ती असून भविष्यात अशी स्थिती पुन्हा येवू नये याकरीता येथील सुज्ञ मतदारांनी राणेंना व काँग्रेसला थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. दादागिरी, सायबांच्या, मर्जीतील व नागरिकांवर हुकूमत गाजविणाऱ्या उमेदवारांना जनता स्विकारणार नाही असे सांगत शिवसेनेच्यावतीने सतराही प्रभागात अभ्यासू, जनतेची सेवा करणारे व निष्ठावंत शिवसैनिक असलेलेच उमेदवार देण्यात आले असून कुडाळचा विकास हा फक्त शिवसेनेच्या माध्यमातूनच होवू शकतो. येथील मतदारसंघात कोट्यवधी रूपयांची विकास कामे सुरू असून सिंधुदुर्गातील मध्यबिंदू असलेल्या कुडाळ शहर सर्वचदृष्ट्या आयडीयल शहर बनविण्याचा संकल्प आहे. आम्ही पोकळ आश्वासने देत नाही तर प्रत्यक्षात विकास कामे करतो. कुडाळचा विकास हा ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच करणार आहोत. शिवसेनेच्यावतीने कुडाळमध्ये विकास कामे मंजूर झाली आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे ती कामे थांबली आहेत. नाहीतर विकास कामांची पोचपावती कुडाळवासियांना मिळाली असती, असेही राऊत म्हणाले. यावेळी बोलताना जान्हवी सावंत म्हणाल्या की, कुडाळ शहराच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे १७ ही उमेदवार निवडून येणार असून पहिला नगराध्यक्ष हा आमचाच असणार
आहे. (प्रतिनिधी)