विजय वडेट्टीवार लवकरच सागर बंगल्यावर दिसतील - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: February 19, 2024 05:47 PM2024-02-19T17:47:37+5:302024-02-19T17:48:28+5:30
कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होत आहे. देशात मोदींची गॅरंटी चालते ...
कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होत आहे. देशात मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे. त्यामुळे कोणाला अजून धक्का बसला तर नवल वाटू नये. येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकत्र सागर बंगल्यावर ते दिसतील असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, विनायक राऊत यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी कोणत्या कडवट सैनिकांना मंत्रीपदे दिली होती, ते त्यांनी सांगावे. विकृतीचे उत्तम दर्शन म्हणजे ठाकरे सेनेची कणकवलीतील सभा होती. त्या सभेत त्या पक्षाचे अध्यक्ष आणि काही नेते जे पातळी सोडून बोलत होते त्याला विकृती म्हणतात. स्वतः आरशात पाहून घ्यावे मग कोणी पातळी सोडली आहे ती कळेल. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण टिकवून दाखवले होते. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ते टिकेल.
मी चुकीचे बोललो नाही
पोलिस माझे काही वाकडे करू शकत नाही ह्याचा अर्थ कोणाचा अपमान करणे असा होत नाही. तर ज्यांना जो इशारा मला द्यायचा होता त्यांना तो निश्चितच कळला आहे. मी हिंदूंची बाजू लावून धरतो. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन, मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचे आहे का? मी कुठेही चुकीचे बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी दिलाय.
राज ठाकरे यांचा मित्र परिवार मोठा आहे. हिंदुत्वाचा विचार असलेले ते सर्व एकत्र आले तर चांगलेच होईल. त्याच विषयाला अनुसरून आशिष शेलार त्यांना भेटले असतील. असेही नितेश राणे म्हणाले.
ओवेशीनी कधी मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी भाषा बोलून लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ओवेशीनी कधी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय का ? ओवेशी ज्यांची बाजू घेऊन बोलत आहेत. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नाही. त्याबाबत त्यांनी सांगावे असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.