पर्यटनातूनच गावचा विकास
By admin | Published: June 5, 2016 12:09 AM2016-06-05T00:09:42+5:302016-06-05T00:09:42+5:30
शेखर सिंह : विजयदुर्गमध्ये सर्कीट आराखडा सादरीकरण
देवगड : जनतेची संकल्पना त्यांचे विचार घेतल्याने एखादी योजना दिर्घकाळ टिकू शकते, यामुळेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विजयदुर्ग सर्कीटचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून गावचा विकास होऊ शकतो, यामुळे लोकांना रोजगार मिळू शकतो यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी लोकांचा उत्साह आणि सहभाग महत्वाचा आहे, असे मत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी विजयदुर्ग येथे व्यक्त केले.
विजयदुर्ग येथे कोकण ग्रामीण पर्यटनांतर्गत ग्रामीण पर्यटन विजयदुर्ग सर्कीट आराखड्याचे सादरीकरण शनिवारी करण्यात आले. हा आराखडा रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी उपसचिव लिना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रणदिवे, देवगड तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे देशमुख, माजी आमदार प्रमोद जठार, विजयदूर्ग सरपंच महेश बिडये आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर सिंंह म्हणाले की, रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग, गिर्ये, तिर्लोट, वाघोटण, पोंभुर्ले, मालपे या गावांमध्ये पर्यटन सर्कीट तयार केले असून या सर्कीटला विजयदुर्ग सर्कीट असे नाव देण्यात आले आहे. अतिशय विवेकबुध्दीने येथील जनतेची संकल्पना घेऊन, येथील गावची परंपरा अबाधित राखून पर्यटन वाढीसाठी आपण काय केले पाहिजे. हे यात नमूद करण्यात आले आहे. पर्यटक वाढले पाहिजेत या दृष्टीकोनातून काम केले पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून गोवा राज्याने मोठी प्रगती केली आहे. यामुळे आपणही गोवा राज्याच्या पूढे जाऊन पर्यटनाची प्रगती केली पाहिजे. कारण गोवा राज्यापेक्षाही कोकणामध्ये विशेषत: सिंंधुदुर्गमध्ये आणि त्यातून देवगडमध्ये अतिशय सुंंदर पर्यटन स्थळे आहेत. विजयदुर्ग, गिर्ये, तिर्लोट, वाघोटण, पोंभुर्ले, मालपे या २७ किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी गेली सहा महिने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करून येथील जनतेच्या समस्या, पारंपरीक पध्दती, येथील संस्कृती, येथील पारंपरिक नृत्य याची माहिती घेऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. या पाचही गावांमध्ये खाडी असून या खाडींमध्ये पर्यटन बोटींची सोय कशा पध्दतीने केली पाहिजे. अशा विचारांची सांगड घालून विजयदुर्ग सर्कीट ग्रामीण पर्यटन आराखड्याचे सादरीकरण केले
आहे. (प्रतिनिधी)