गावठी हातभट्टी दारूवर छापा, फाथरनवाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:43 AM2020-05-09T10:43:06+5:302020-05-09T10:45:47+5:30
कुडाळ तालुक्यातील फाथरनवाडी येथे बिगर परवाना कायदा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्या प्रकरणी सुरेश परब (७०, राहणार सरंबळ परबवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
कुडाळ : तालुक्यातील फाथरनवाडी येथे बिगर परवाना कायदा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्या प्रकरणी सुरेश परब (७०, राहणार सरंबळ-परबवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस योगेश मांजरेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की फाथरनवाडी येथे गैरकायदा बिगर परवाना हातभट्टीची दारू काढण्यात येत असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली.
या माहितीनुसार कुडाळ पोलीस मंगळवारी सायंकाळी सदर ठिकाणी पंच व एका स्थानिकाला सोबत घेऊन गेले. यावेळी एका झोपडीवजा शेडमध्ये हातभट्टीची दारू काढण्यात येत असल्याचे येथील सर्व साहित्यावरून दिसून आले. त्यामुळे याप्रकरणी संशयित म्हणून सुरेश परब यांना ताब्यात घेत पोलिसांनी पंचनामा केला असता त्याने हातभट्टीची जागा दाखवली.
परब यांनी यावेळी सदरचे हे रसायन आम्ही शेती फवारणीसाठी तयार करत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनाही बोलून सदरची खात्री केली असता कृषी अधिकारी यांनी सदरचे हे रसायन औषध फवारणीसाठी नसल्याचे सांगितले. त्यामुळे या ठिकाणी हातभट्टीची दारू करण्यात येत असल्याचे सिद्ध झाले.
कुडाळ पोलिसांनी या प्रकरणी सुरेश परब यांच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून पोलिसांनी हातभट्टीची दारू काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले रसायन भरलेले सुमारे ४ हजार ८०० रुपये किमंतीचे २ अॅल्युमिनियम धातूचे ड्रम, सुमारे ३ हजार ६०० रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची टाकी त्यामधील वीस लिटर रसायन, ३ हजार रुपयाचे प्लास्टिकचे रसायन भरलेले कॅन, १ हजार ५०० रुपयाचे लोखंडी उपकरण यामध्ये स्टीलच्या धातू फिरवण्याचा हँडल तसेच इतर रसायने व मोरचूद असे साहित्य जप्त केले.
घटनास्थळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ही पाहणी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.