आशिया खंडात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे 'हे' गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 01:05 PM2021-12-01T13:05:28+5:302021-12-01T13:07:10+5:30
देश-विदेशातील पर्यटक देतात या गावाला भेट, कोणत आहे 'हे' गाव..
गिरीश परब
सिंधुदुर्गनगरी : आशिया खंडातील सर्वात स्वच्छ असलेल्या मावलीनोंग गावाला सिंधुदुर्ग मुख्यालय पत्रकारांनी भेट दिली. स्वच्छतेत अव्वल असलेले मावलीनोंग हे खेडेगाव मेघालय राज्यातील शिलाँगपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. अवघी पाचशे ते सहाशे लोकांची वस्ती असलेले हे गाव आशिया खंडात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. गावाची स्वच्छता कशी असावी आणि कशी राखावी हे या गावातील ग्रामस्थांकडून शिकावे. म्हणूनच देश-विदेशातून पर्यटक या गावाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत असलेल्या पत्रकारांचा अभ्यास दौरा आसाम, मेघालय येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान मेघालय राज्यातील या सुंदर गावाला पत्रकारांनी भेट देत पाहणी केली. जिल्हा प्रशासनाचे नोडल ऑफिसर म्हणून विलास आरोंदेकर या टीममध्ये सहभागी झाले होते.
गावात प्रवेश करताच प्रसन्न वातावरण
गावात प्रवेश करताच चहूबाजूला पाहिले तर, प्रसन्न वातावरण दिसून येते. कुठेही कचरा आढळून येत नाही. आशिया खंडात स्वच्छतेत एक नंबर आलेल्या या गावाने स्वच्छतेच्या जोरावरच देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गावात पर्यटकांची अक्षरश: रिघ लागत आहे. याचा फायदा या गावाने उचलला आहे. स्वच्छतेचे जगभरात या गावाचे नाव झाले आहे. ही संधी साधत त्यांनी पर्यटनाचे मार्केटिंग केले.
विविध करांतून उत्पन्न वाढविले
देश-विदेशातील पर्यटक गावाची स्वच्छता पाहण्यासाठी येतात. या स्वच्छतेतून उत्पन्नही या गावाने उपलब्ध करून दिले आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून प्रत्येकी ४० रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. पार्किंग कर घेतला जातो. तसेच बाथरूमसाठीही पैसे आकारले जातात. यातून त्यांनी आपल्या गावचे उत्पन्न वाढवले आहे. शासनाच्या विविध योजना अगदी प्रामाणिकपणे प्रशासनाच्या सहकार्याने राबविल्या जात असल्याचे सांगितले. एमआरजीएस या योजनेतून गावाचा कायापालट केला. रस्ते, गटार, घराच्या दारासमोर फुलझाडे, आतूनच पाईपलाईन गटार अगदी स्वच्छ होती.
बारकाईने स्वच्छता जपली
तेथील ग्रामस्थ घरांवर जास्त पैसे खर्च करत नसल्याचे दिसून आले. घरे अतिशय साध्या पद्धतीची परंतु देखणी. दोन आणि तीन खोल्यांची घरे आहेत. घरात चुलीही आहेत. मात्र, घराची ठेवण अगदी स्वच्छ आहे. एवढ्या बारकाईने त्यांनी स्वच्छता जपली आहे. प्रत्येक घराच्या समोर डस्टबिन ठेवला आहे. अतिशय साधे परंतु बांबूच्या साहाय्याने तयार केलेले डस्टबिन दिसले. यासाठी वेगळ्या प्रकारे निविदा काढावी लागत नाही. अशा देखण्या व स्वच्छ गावात गेल्याचे समाधान वाटते.
या दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, रवी गावडे, बाळ खडपकर, संजय वालावलकर, संदीप गावडे, विनोद दळवी, नंदकुमार आयरे, लवू म्हाडेश्वर, गुरू दळवी, विनोद परब, मनोज वारंग, सतीश हरमलकर, गिरीश परब सहभागी झाले होते.