गाव विकासासाठी एकजूट हवी : राऊत
By admin | Published: March 4, 2016 09:50 PM2016-03-04T21:50:41+5:302016-03-05T00:11:44+5:30
डेगवे हितवर्धक संघाचे सातवे संमेलन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार
बांदा : डेगवे गाव हे निसर्गसंपन्न आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी डेगवेवासीयांनी एकजुटीने व एकमताने कार्य करणे गरजेचे आहे. येथील श्री स्थापेश्वर-महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपले पूर्ण सहकार्य असणार आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी मुंबई येथे केले.
मुंबई येथील डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या मुंबई-विलेपार्ले येथे झालेल्या सातव्या वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात खासदार राऊत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गुरुनाथ देसाई होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिवराम दळवी, महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रंथालय संचालक डॉ. बी. ए. सनान्से, मराठा बँकेच्या अध्यक्षा अनुश्री माळगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. विनायक राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरुनाथ देसाई यांनी स्वागत केले. सरचिटणीस उल्हास देसाई यांनी संस्थेच्या ६८ वर्षांच्या कार्यकाळातील कार्याचा अहवाल मांडला. यावेळी स्थापेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी आवाहन पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांना गावातील विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. सनान्से, शिवराम दळवी यांनी विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रम झाले. माधवी देसाई व किशोर देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुदेश देसाई यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष तातोबा देसाई, खजिनदार नितीन देसाई, गोपाळकृष्णा वराडकर, रमेश पडवळ, दत्ताराम देसाई, नंदादीप वाचनालयाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र देसाई, सुरेश देसाई, निता देसाई, पल्लवी वराडकर, दर्शना देसाई, विकास नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)