नादुरुस्त खारलँड बंधाऱ्याचा फटका बसतोय ग्रामस्थांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:33 PM2020-12-16T12:33:08+5:302020-12-16T12:34:47+5:30
Dam, Sindhudurg आचरा हिर्लेवाडी येथील शिवापूर खारलँड बंधाऱ्याची झडपे तुटून चार महिने झाले आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची तसेच शिवापूर सोसायटीची सुमारे दीडशे एकर शेतजमीन खारपड होऊन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
आचरा : आचरा हिर्लेवाडी येथील शिवापूर खारलँड बंधाऱ्याची झडपे तुटून चार महिने झाले आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची तसेच शिवापूर सोसायटीची सुमारे दीडशे एकर शेतजमीन खारपड होऊन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
येथील शेतकऱ्यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून, संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता.
याबाबत खारलँड अधिकारी वेल्लार यांच्याशी संपर्क साधल्यावर टेंडर प्रक्रिया होत नसल्याने काम रेंगाळले होते. मात्र, येत्या आठ दिवसांत हिर्लेवाडी येथील शिवापूर बंधाऱ्याला झडपे बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खाडी किनारपट्टीलगत असलेल्या हिर्लेवाडी येथील खारलँड बंधाऱ्याची झडपे तुटून गेल्याने येथील शेतकऱ्यांची आणि शिवापूर सोसायटीची शेतजमीन खारपड होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाऱ्या पाण्यामुळे माडबागायत मरून जाऊ लागली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे पाणी खारे होऊ लागले आहे. यामुळे येथील शेतकरी व शिवापूर सोसायटीचे विनोद मुणगेकर, वराडकर आदींनी खारभूमी कार्यालय कणकवली येथे संपर्क साधून, पत्रव्यवहार करून बाब संबंधितांच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र, संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसून कोरोनाचे कारण पुढे केले जात आहे. आठ दिवसांपूर्वी ठेकेदाराला वर्क ऑर्डर काढल्याचे अधिकारी सांगत असले तरी ठेकेदार वर्क ऑर्डर मिळाली नसल्याचे सांगत असल्याचे मुणगेकर सांगतात. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आक्रमक पवित्रा घेणार
चिखल फळ्या टाकून खारे पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास हरकत नव्हती. एका बोगद्याला केवळ फळ्या बसविण्यात आल्या असून त्यावर अजूनही माती टाकली नाही. खारभूमी विभागाच्या निष्काळजी पणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा मुणगेकर यांनी दिला आहे.