रेडी येथील ग्रामस्थांचा वीज अभियंत्याला घेराओ
By admin | Published: June 10, 2014 01:33 AM2014-06-10T01:33:59+5:302014-06-10T01:36:08+5:30
रेडी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीजग्राहकांनी रेडी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता राकेश कुंंभार यांना घेराव घालून धारेवर धरले.
रेडी : रेडी परिसरात गेले काही दिवस कोणत्याही वेळी पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वीजग्राहकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत रेडी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता राकेश कुंंभार यांना घेराव घालून धारेवर धरले.
रेडी हा औद्योगिक गाव आहे. या गावात सुमारे २५०० वीजग्राहक आहेत. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीला वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. परंतु रेडी गावात अल्प वीज कर्मचारी असल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे वेळीच निराकारण होत नाही. गावातील वीज खांबांवरील जीर्ण झालेल्या तारा वारंवार तुटून पडतात. विद्युत तारांवरील झाडी पावसाळ्यापूर्वी तोडण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या दिवस-रात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. याचा परिणाम विजेवर चालणाऱ्या व्यवसायांवर होऊन नुकसान होत आहे. विजेचे पंखे बंद राहिल्याने उष्मा आणि डासांमुळेही जनता हैराण होत आहे. तसेच बदली झालेले कर्मचारी गजा कांबळी हे पुन्हा रेडी येथे आल्यापासून विजेच्या तक्रारी वाढल्याचे कनिष्ठ अभियंता कुंभार यांच्या निदर्शनास आणून कांबळी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वीज पुरवठ्यात सुधारणा न के ल्यास वीजबिले भरणार नाही, असा इशारा देण्यात आला. कनिष्ठ अभियंता म्हणून रेडी येथे नेमणूक झाली असूनही तुम्ही वेंगुर्लेत का राहता, अशी विचारणा कुं भार यांना करण्यात आली. यावर त्यांनी रेडी येथे मुक्कामासाठी राहण्याचे मान्य केले. तसेच मळेवाड-आरोंदा रेडी या समस्याग्रस्त फिडरला पर्याय म्हणून शिरोडा फिडरमधून वीजपुरवठा देण्याचे मान्य केले. तसेच वीज कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत किंवा अन्य कोणीतरी फोन उचलून ते बाहेर गेल्याचे सांगतात, अशी तक्रार ग्राहकांनी केली. यावेळी वीज कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करून वीजग्राहकांसमोर त्याला समज देण्यात आली.
यावेळी अजित सावंत, उपसरपंच दीपक राणे, ग्रामपंचायत सदस्य चक्रपाणी गवंडी, राजेंद्र राणे, स्वप्निल नाईक व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)