मांगेलीतील दगड उत्खनन ग्रामस्थांनी बंद पाडले

By admin | Published: December 9, 2014 08:25 PM2014-12-09T20:25:02+5:302014-12-09T23:24:29+5:30

कामगारांनाही हाकलले : तहसीलदारांच्या सहीचा परवाना आढळला

The villagers stopped the exploration of Mangley | मांगेलीतील दगड उत्खनन ग्रामस्थांनी बंद पाडले

मांगेलीतील दगड उत्खनन ग्रामस्थांनी बंद पाडले

Next

कसई दोडामार्ग : तहसीलदार कार्यालयाकडून शिरंगे सर्व्हे नं. ३८ मध्ये काळ्या दगड गौण खनिजाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मांगेली सर्व्हे नं. १९ व २३ मध्ये गौण खनिज बेकायदेशीर सुरू असल्याने सभापती महेश गवस व ग्रामस्थ यांनी या काळ्या दगडाचे उत्खनन काम बंद पाडून कामगारांना हाकलून लावले. या कामाला परवानगी दिली नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तहसीलदारांच्या सहीचा परवाना देण्यात आला होता. त्यामुळे गवस यांनी तहसीलदारांच्या दुटप्पी धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्प क्षेत्रातील ज्या अनधिकृत क्वारी सुरु आहेत, त्या त्वरीत बंद कराव्यात, असे महेश गवस यांनी सांगितले.
शिरंगे येथे ३८ सर्व्हे नंबरमध्ये सन २०१० पासून काळ्या दगडाचे उत्खनन सुरू आहे. मात्र, हे उत्खनन मांगेली सर्व्हे नं. १९ व २३ मध्ये सुरू आहे असे ग्रामस्थांना समजले. ग्रामस्थांनी या काळ्या दगडाला गौण खनिजाला परवानगी दिली नाही. असे असताना गेली तीन वर्षे ही अनधिकृत क्वॉरी येथे अतिक्रमण करून सुरू करण्यात आली आहे. याबाबत सभापती महेश गवस यांनी तहसीलदार यांना विचारले असता, आपल्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत परवानगी दिली नसून क्वॉरी चालू नाही, असे सांगितले. त्यामुळे महेश गवस, सुनील गवस, संजय गवस, भिकाजी गवस, नामदेव गवस यांनी क्वॉरीवर धडक दिली. यावेळी प्रत्यक्षात या क्वॉरीचे काम सुरू होते. सुरूंग स्फोट करून दगडाचे उत्खनन करण्यात येत असताना रंगेहात ग्रामस्थांनी पकडले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन ही क्वॉरी कोणी चालू केली, आमच्या डोंगरात अतिक्रमण का केलात, तुम्हाला परवानगी कोणी दिली, खाणकाम बंद करा, असा पवित्रा घेतला. यावेळी आम्हाला तहसीलदार यांनी परवानगी दिली आहे, सर्व्हे नं. ३८ मध्ये शिरंगे येथे परवानगी दिली आहे. त्याचा पुरावा गवस यांना दिला. या परवान्यावर तहसीलदार यांची सही होती. त्यामुळे तहसीलदारांचे पितळ उघडे पडले. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काम त्वरीत बंद करा, असा पवित्रा घेत काम बंद पाडले. कामगारांना हाकलून देण्यात आले. यावेळी त्याठिकाणी काही जिवंत भूसुरूंगही आढळून आले. तसेच एकीकडे परवानगी नाही, असे सांगून परवानगी देण्याच्या तहसीलदार यांच्या दुटप्पी धोरणाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तिराळी पाटबंधारे प्रकल्प हद्दीत अनधिकृत दगड उत्खननाचे काम जोरात सुरू आहे. असे असताना तहसीलदार कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. त्यामुळे भविष्यात धरणाला धोका आहे. त्यामुळे या क्वॉरी त्वरीत बंद कराव्यात. तहसीलदारांवर विश्वास नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन क्वॉरी बंद करण्याची मागणी करणार असल्याचे महेश गवस यांनी सांगितले. तसेच बेकायदेशीर व अतिक्रमण करून मांगेली डोंगरात काळ्या दगडाची गौण खनिज खाण सुरू आहे. गेली तीन वर्षे हे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात दगड वाहतूक करण्यात येत आहे. या क्वॉरीची पूर्णपणे चौकशी करून दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी व प्रांत यांनी करावी, अशी मागणी सुनील गवस यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The villagers stopped the exploration of Mangley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.