भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली

By admin | Published: January 19, 2016 12:05 AM2016-01-19T00:05:23+5:302016-01-19T00:05:55+5:30

श्रावण येथील धरण : ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांना घेराव

The villagers stopped the land counting | भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली

भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली

Next

आचरा : श्रावण गवळीवाडी येथील पावणाईचे भाटले व झऱ्याची वाडी क्षेत्रात लघुपाटबंधारे योजनेतून होऊ घातलेल्या धरणाच्या भू मोजणीस ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत १५ हेक्टरच्या भू मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घालत भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली. भू मोजणीचे काम लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग आंबडपाल कुडाळ यांच्यामार्फत होणार होते. यावेळी संसार उद्ध्वस्त करणारे धरणच नको असल्याने मोजणीच कशाला असा सवाल करत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला.
यावेळी मोजणीसाठी लघुसिंचन उपविभागीय अभियंता व्ही. आर. अजेटराव, शाखा अभियंता एस. पी. टकले, भू मापन अधिकारी चैतन्य गोसावी, वनविभागाचे राठोड, मंडल अधिकारी एन. बी. पाटील, ठेकेदार बाप्पा मांजरेकर उपस्थित होते. यावेळी मोजणी रोखण्यासाठी ग्रामस्थांसोबत माजी सभापती सीमा परुळेकर, राजू परुळेकर, नितीन पवार, ग्रामस्थ प्रकाश सावंत, विजय गवळी, मंगेश यादव, दीपक पाटकर, प्रमोद गवळी, दीपाली पाटकर, सिमंतनी कासले, सविता सडेकर, विद्या गवळी, सुगंधा नाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, श्रावण गवळीवाडीतील धरणासाठी लागणाऱ्या १५ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी भू मोजणीच्या नोटीसा ३ जानेवारीला ग्रामस्थांना बजावण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामस्थांनी नोटीसा न स्वीकारत आपला धरणास असलेला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले होते.
अधिकाऱ्यांना रस्त्यावरच रोखले
सोमवारी १० वाजण्याच्या सुमारास मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी श्रावण गवळीवाडीच्या रस्त्यावरच रोखले. आम्हाला धरणच नको आहे तर तुमची मोजणी कशाला असा सवाल करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी अधिकारी व ठेकेदार आप्पा मांजरेकर यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. गावात मोजणीसाठी पाऊलही ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे आता हा धरण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.(वार्ताहर)


धरण झाल्यास : आत्मदहनाचा इशारा
ग्रामस्थांच्यावतीने बाजू मांडताना विजय गवळी म्हणाले की, ४५ एकर जमीन या धरणात जाणार आहे. आमच्या आंबा, काजू कलमे बागा यात नष्ट होणार आहेत. आमच्या शेतजमिनीही राहणार नाहीत तर आम्हाला धरणाचा काय उपयोग असा सवाल अधिकाऱ्यांना केला तर शासन आमच्यावर जबरदस्तीने धरण लादत असेल तर श्रावण गवळीवाडीत प्रत्येक ग्रामस्थ आत्मदहन करेल असा इशारा देत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना गावातून निघून जाण्यास सांगितले. ग्रामस्थांचा विरोध असेल तसा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवू असे सांगत ग्रामस्थांची मोजणीस परवानगी नसेल तर मोजणी करणार नाही असे सांगत काढता पाय घेतला.


महिलांची आक्रमक भूमिका
दरम्यान, अधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा चालू असताना मोजणीसाठी आलेल्या ठेकेदाराच्या कामगारांची गाडी गावात गेली असता महिलांनी गाडीचा पाठलाग करत वाडीत घुसलेली गाडी परतवून लावली व आमचे संसार बुडविणारे धरण कदापी होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Web Title: The villagers stopped the land counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.