कुडाळ नगराध्यक्षपदी विनायक राणे
By admin | Published: May 12, 2016 10:35 PM2016-05-12T22:35:04+5:302016-05-12T23:48:18+5:30
उपनगराध्यक्ष अनंत धडाम : काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे विनायक राणे यांची निवड झाली आहे. राणे यांनी शिवसेनेचे गणेश भोगटे यांचा दोन मतांनी पराभव केला, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे अनंत धडाम यांची निवड झाली. या निवडीमुळे काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुडाळात जोरदार जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला, तर अपक्ष इजाज नाईक हे तटस्थ राहिले.
नवीनच निर्माण झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नऊ, शिवसेनेचे सहा, भाजपचा एक व अपक्ष एक, असे नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
या ठिकाणी निर्विवाद काँग्रेसची सत्ता आली असल्याने कुडाळच्या या पहिल्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे कोणाची वर्णी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, या नगराध्यक्ष पदासाठी ७ मे रोजी काँग्रेसकडून नारायण राणे यांनी कुडाळ ग्रामपंचायतीमध्ये या अगोदर उपसरपंच असलेले व या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ सांर्गिडेवाडीमधून आव्हानात्मक आठ विरोधातील उमेदवारांचे चक्रव्यूह भेदून विजयश्री खेचून आणणारे काँग्रेसचे नगरसेवक विनायक राणे यांचे नाव जाहीर केले होते. गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या उपस्थितीत ही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार विनायक राणे यांना नऊ मते पडली, तर शिवसेनेचे उमेदवार गणेश भोगटे यांना सात मते पडली. इजाज नाईक हे तटस्थ राहिले. हा निकाल पाहता शिवसेनेचे उमेदवार गणेश भोगटे यांचा दोन मतांनी पराभव करीत विनायक राणे हे कुडाळचे पहिले नगराध्यक्ष बनले.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर एका तासाच्या फरकाने कुडाळ नगरपंचायतीच्या कार्यालयात उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडीत काँग्रेसचे अनंत धडाम विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा राणे यांचा दोन मतांनी पराभव केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषदेचे माजी उपजिल्हाध्यक्ष रणजित देसाई, राष्ट्रवादीचे अमित सामंत, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, जिल्हा सचिव राकेश कांदे, तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, उपतालुकाध्यक्ष रूपेश पावसकर, सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, प्रवीण काणेकर, अनिल खुडपकर, प्रसाद धडाम, अस्मिता बांदेकर, रूपेश कानडे, पप्या तवटे, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड होताच काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांचा गजर करीत मोठा जल्लोष साजरा केला.
अपक्ष तटस्थ आणि शिवसेनेचा भ्रमनिरास
प्रभाग क्रमांक आठचे अपक्ष उमेदवार इजाज नाईक यांना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी जाहीर पाठिंबा देत आपला उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीत इजाज नाईक हे शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील, असा विश्वास शिवसेनेला होता. मात्र, इजाज नाईक यांनी शिवसेना किंवा काँग्रेसच्या बाजूने मतदान न करता ते तटस्थ राहिले. नाईक यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा भ्रमनिराश झाला असावा, तर भाजपच्या एकमेव नगरसेविका उषा आठल्ये यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.
निर्वाचन अधिकारी उशिरा, सर्वांची धावपळ
गुरुवारच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी अजय घोळवे यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन करण्याची जबाबदारी सकाळी १० ते १२ या वेळेत होती. मात्र, निर्वाचन अधिकारी अजय घोळवे उशिरा आल्याने सर्वांची धावपळ उडाली होती.