Lok Sabha Election 2019 : विनायक राऊत हे पर्ससीन मच्छीमारांचे दलाल : नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:41 PM2019-03-26T13:41:18+5:302019-03-26T13:43:29+5:30
पारंपरिक मच्छीमार आपले दैवत असल्याचे खासदार विनायक राऊत हे सांगत आहेत. पण पारंपरिक मच्छीमार जर त्यांचे दैवत आहेत तर संसदेत त्यांनी त्यांचे किती प्रश्न मांडले ? तसेच आतापर्यंत एलईडी फिशिंग, पर्ससीन नेट मच्छीमारी याविषयक काय केले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे खासदार विनायक राऊत हे पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक करीत असून ते अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या पर्ससीन नेट धारकांचे दलाल आहेत. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली : पारंपरिक मच्छीमार आपले दैवत असल्याचे खासदार विनायक राऊत हे सांगत आहेत. पण पारंपरिक मच्छीमार जर त्यांचे दैवत आहेत तर संसदेत त्यांनी त्यांचे किती प्रश्न मांडले ? तसेच आतापर्यंत एलईडी फिशिंग, पर्ससीन नेट मच्छीमारी याविषयक काय केले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे खासदार विनायक राऊत हे पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक करीत असून ते अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या पर्ससीन नेट धारकांचे दलाल आहेत. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांची यादीच पत्रकारांसमोर सादर केली. तसेच ते पुढे म्हणाले, खासदार राऊत यांनी पारंपरिक मच्छीमारांचा एकही प्रश्न संसदेत विचारलेला नाही.
विनायक राऊत चांगले भजनी बुवा आणि कीर्तनकार आहेत. मात्र, जनतेने त्यांना भजन करायला नाही तर आपले प्रश्न सोडविण्यासाठी खासदार म्हणून निवडून दिले आहे.
विनायक राऊत यांच्या निष्क्रियतेमुळेच पारंपारिक मच्छीमारांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. १४ फेब्रुवारी रोजी खासदार राऊत पर्ससीन मच्छीमारांसोबत दिल्ली येथे 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत होते का ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. दिल्लीत कृषिमंत्र्यांशी खासदार राऊत यांनीच पर्ससीन मच्छीमारांची भेट घडवली होती. त्याची वृत्तेही प्रसिद्ध झाली आहेत.
पारंपरिक मच्छीमार गरीब आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत. याउलट पर्ससीननेटवाले राऊतांना आर्थिक रसद पुरवत आहेत. त्यामुळे राऊत हे पर्ससीन मच्छीमारांचे दलाल बनले आहेत. असा आरोप ही नितेश राणे यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, खासदार राऊत बीएसएनएल टॉवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकून मोकळे झाले आहेत. मात्र त्यांनी त्या टॉवर मधून रेंज कधी मिळणार ते सांगावे ? तसेच त्यांनी बीएसएनएलची रेंज ग्राहकांना मिळवून द्यावी . तसे झाले तर त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू. असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सीआरझेड हा केंद्रस्तरीय प्रश्न आहे. हा प्रश्न खासदार राऊत यांनी मागील ५ वर्षांत का नाही सोडवला? किनारपट्टीवरील जनतेने मागील निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र देवबाग, तारकर्ली भागातील जनतेला आता महसूल विभागाकडून बांधकाम तोडण्याच्या नोटीशी दिल्या जात आहेत. या नोटीशी संबधित जनतेने फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकाव्यात. त्या जनतेच्या हितासाठी आम्ही सोबत आहोत. पारंपरिक मच्छीमारांना त्रास देणाऱ्या मत्स्य अधिकारी वस्त यांना मीच वठणीवर आणले होते. त्यावेळी शिवसेनेनेच त्या अधिकाऱ्याला पाठीशी घातले होते. असेही ते यावेळी म्हणाले.
फक्त २४ तास द्या, एलईडी फिशिंग बंद करून दाखवतो !
आम्हाला फक्त २४ तास द्या . सर्व एलईडी फिशिंग बंद करून दाखवतो. फक्त पोलिसांना त्या २४ तासांत सुट्टीवर पाठवा. आम्ही असे काही करायला गेलो की पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले जातात. आमच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात पारंपारिक मच्छीमारांना पूर्ण संरक्षण देणार, एलईडी फिशिंग पुर्ण बंद करणार असे मुद्दे असणार आहेत. आता रक्त सांडले तरी बेहत्तर , वेळ प्रसंगी रस्त्यावरील लढाई तसेच न्यायालयीन लढाई करावी लागली तरी पारंपरिक मच्छीमारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
नाराजांकडे लक्ष द्यायला वेळ नाही!
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार जोरदार सुरू आहे. त्यामुळे भाजप सारख्या इतर पक्षातील नाराजांकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाही. असा उपरोधिक टोला एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान नितेश राणे यांनी लगावला .