विनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:57 AM2019-03-02T11:57:40+5:302019-03-02T11:59:51+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .
कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .
कणकवली येथील विजय भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, मानसी मुंज, शहर प्रमुख शेखर राणे, तेजस राणे, सुजित जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू, तेजल लिंग्रज, साक्षी आमडोसकर, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग, रीमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विनायक राऊत यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेना व भाजप यांची निवडणुकीसाठी युती झाली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेना नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही निश्चितच समन्वय होईल. तसेच नाराज असलेल्यांची नाराजीही दूर केली जाईल.
खासदार विनायक राऊत यांनी सक्षमपणे गेली पाच वर्षे काम केले आहे. केंद्रशासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या आहेत. नरेंद्र मोदिंच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवीत आहेत. तर पक्षाच्या आदेशावर काम करणारे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जाईल . असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.
संदेश पारकरांशी आमचे घरगुती संबध !
भाजप नेते संदेश पारकर यांच्याशी आमचे खूप वर्षांपासून घरगुती संबध आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो. विधानसभा निवडणूक समोर ठेवून आमची कोणतीही भेट नाही. सध्या आम्ही लोकसभेची तयारी करीत आहोत. तसेच युती झाल्यामुळे भाजप मधील नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सध्या तरी नाही. अशा शब्दात संदेश पारकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चचेर्बाबतचे स्पष्टीकरण आमदार वैभव नाईक यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान दिले.
राणेंची भूमिका सतत बदलते !
शिवसेनेचे खासदार तसेच आमदार निवडून येत असल्याने नारायण राणेंची खऱ्या अथार्ने अधोगती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची अधोगती झाली असे वक्तव्य त्यांनी करू नये. शिवसेना - भाजप युती झाल्यामुळे तसेच शिवसेनेच्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांचा पक्ष खासदारकीच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या कार्यसम्राट सुपुत्राची जाहीर केलेली उमेदवारी कायम ठेवावी आणि निवडणूक लढवावी. म्हणजे जनता त्यांना जागा दाखवून देईल.असे यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले.